प्रेम आंधळं असतं असं कायम म्हटलं जातं. प्रेमासाठी आणि प्रेमात लोक जीव द्यायलाही तयार असतात आणि जीव घ्यायलाही तयार असतात. असेच एक उदाहरण उत्तर प्रदेशातील लखनौमधून समोर आले आहे. प्रियकराच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या आईने आपल्याच मुलीची निर्दयीपणे हत्या केली. रोशनी खान आणि तिचा प्रियकर उदीत जयस्वाल यांच्या प्रेमात तिची 5 वर्षांची मुलगी अडचण ठरत होती. ती आपले अनैतिक संबंध उघड करेल अशी रोशनीला भीती होती. त्यामुळे तिला मार्गातून दूर करण्याचा त्यांनी कट रचला.
मिळालेल्या माहितीनुसार, रोशनी खानने तिचा प्रियकर उदित जयस्वालसोबत मिळून आधी आपल्या मुलीला मारहाण केली आणि नंतर तिचा गळा दाबून खून केला.प्रेमात वेड्या झालेल्या रोशनीने मुलीच्या शरीरावर पाय ठेवले. त्यानंतर तिला पलंगाच्या बॉक्समध्ये बंद करून ठेवले. मृतदेहातून वास येऊ लागल्यावर तो बाहेर काढून एसीसमोर ठेवला. आपण घरामध्ये राहणं सुरक्षित नाही, असं रोशनीला वाटलं. त्यानंतर तिनं घराला कुलूप लावले. ती उदितसोबत लखनौमधीलच एका हॉटेलमध्ये गेली.
तिथे दोघांनी दारू पिली आणि रात्रभर पार्टी केली.रोशनीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून सांगितले की, तिच्या मुलीला तिच्या पतीनेच मारले आहे. परंतु, पोलिसांच्या तपासात सत्य बाहेर आले. रोशनीचे सासरच्या लोकांशीही आधीपासूनच पटत नव्हते. तिने यापूर्वीही सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. हे लक्षात घेऊन रोशनीने 13 जुलै रोजी मुलीची हत्या करून आपला पती शाहरुखला फसवण्याचा कट रचला होता.