नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेल्या शांतता रॅलीमध्ये चोरट्यांनी संधी साधून कार्यकर्त्यांच्या जवळील सुमारे 18 तोळे सोन्याचांदीचे दागिने चोरून नेल्याच्या नोंदी पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आल्या आहेत.
पहिली फिर्याद केशव पंढरीनाथ ढोली (रा. वावरेनगर, कामटवाडा, सिडको) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यात म्हटले, की ढोली हे मनोज जरांगे-पाटील यांच्या शांतता रॅलीमध्ये सहभागी झाले होते. ते काट्या मारुती सिग्नल चौकात उभे असता तेथील गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांची नजर चुकवून त्यांच्या गळ्यातील 30 हजार रुपये किमतीची एक तोळा वजनाची सोन्याची चेन.
शांतता रॅली मालेगाव स्टॅण्ड येथे आली असता रॅलीत सहभागी असलेले सौरभ देवचंद महाले यांच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीची दोन तोळे वजनाची सोन्याची चेन व सीमा माधव पिंगळे यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे 60 हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस हवालदार घुके अधिक तपास करीत आहेत.
चोरीची दुसरी फिर्याद ज्ञानेश्वर कारभारी शिंदे (रा. वनसगाव, ता. निफाड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की शिंदे हे मराठा समाजाचे शांतता रॅलीमध्ये सहभागी झाले होते. ते सकाळी 11 वाजता जनार्दन स्वामी मठाजवळील कमानीनजीक उभे होते.
त्यावेळी शिंदे यांच्या गळ्यातील 30 हजार रुपये किमतीची दीड तोळा वजनाची सोन्याची पोत, 50 हजार रुपये किमतीची अडीच तोळा वजनाची सोन्याची चेन, 18 हजार रुपये किमतीची एक चेन, चार हजार रुपये किमतीची दोन तोळ्यांची सोन्याची चेन, त्याचप्रमाणे रॅलीमध्ये सहभागी इतर कार्यकर्त्यांच्या गळ्यातील अनुक्रमे 60 हजार रुपये किमतीची तीन तोळे वजनाची सोन्याची चेन, 46 हजार रुपये किमतीची अडीच तोळे वजनाची व 20 हजार रुपये किमतीची एक तोळा वजनाची सोन्याची चेन असे एकूण 3 लाख 54 हजार रुपये किमतीचे दागिने गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने चोरून नेले.
या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.