मंकीपॉक्सचा वाढता धोका, मुंबई महापालिका अलर्ट मोडवर
मंकीपॉक्सचा वाढता धोका, मुंबई महापालिका अलर्ट मोडवर
img
दैनिक भ्रमर
जगभरात विविध देशांमध्ये ‘मंकीपॉक्स’ या विषाणूजन्य आजाराचा संसर्ग वाढत असल्याचे आढळले आहे. मंकीपॉक्स या संसर्गजन्य आजाराचा दिवसेंदिवस धोका वाढला आहे. दरम्यान , मोठ्याबरोबरच लहान मुलांना देखील या आजाराचा धोका वाढला असताना मुंबईत महानगरपालिका हाय अलर्ट मोडवर गेली आहे. संसर्ग संदर्भात मुंबई महापालिका अलर्ट आली खबरदारीचा उपाय म्हणून सेव्हन हिल्स रूग्णालयात 14 रूग्णशय्या असलेला कक्ष आरक्षित करण्यात आला आहे. या आजाराचा मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अद्याप एकही रूग्ण नाही. मात्र शासनाच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेने उपाययोजना तयार केल्या आहेत

पाकिस्तान आणि स्वीडन या देशात ‘मंकीपॉक्स’ या संसर्गजन्य आजाराने बाधित रूग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. मुंबई महानगरात विदेशातून येणाऱ्यांची संख्या लक्षात घेता अधिक सावधगिरी बाळगण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आरोग्य माहिती कक्षासोबत समन्वय साधण्यात येत आहे


याचाच एक भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका संचलित सेव्हन हिल्स रूग्णालयात 14 रूग्णशय्या असलेला कक्ष आरक्षित करण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ‘मंकीपॉक्स’ संसर्गाचा अद्याप एकही रूग्ण आढळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असेही आवाहन करण्यात येत आहे. जगातील काही देशात ‘मंकीपॉक्स’ संसर्गाचा वेग आणि तीव्रता लक्षात घेता केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने भारतातील सर्व राज्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तसेच , महाराष्ट्र शासनाकडूनदेखील ‘मंकीपॉक्स’ सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजना करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तसेच मुंबई महानगरात विदेशातून येणाऱया नागरिकांचे प्रमाण पाहता बृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘मंकीपॉक्स’ आजाराच्या प्रतिबंध आणि उपाययोजनांसाठी तयारी सुरू केली आहे. संसर्गजन्य आजारांवरील वैद्यकीय उपचारांसाठी विशेष रूग्णालये असलेल्या व बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित सेव्हन हिल्स रूग्णालयात संभाव्य ‘मंकीपॉक्स’ रूग्णांसाठी आरक्षित कक्ष  व्यवस्था करण्यात आली आहे. या कक्षामध्ये चौदा रूग्णशय्या आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. तसेच गरजेनुसार ही संख्या वाढवण्याचीही रूग्णालय प्रशासनाने तयारी ठेवली आहे. 

‘मंकीपॉक्स’ संसर्गाचा वेग आणि रोगाची तीव्रता लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. या बैठकीमध्ये ‘मंकीपॉक्स’ संसर्गास वेळीस प्रतिबंध करण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राकरीता 14 रूग्णशय्या आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. प्रसंगी या रूग्णशय्यांची संख्या वाढवण्याची तयारीही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य प्रशासनाने केली आहे.     

परदेशातून येणाऱ्या पर्यटकांच्या अनुषंगाने विमानतळ प्राधिकरणासोबत नियमितपणे समन्वय आणि संपर्क साधण्याच्या सूचना बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी दिल्या आहेत.    

मंकीपॉक्सचा प्रसार कसा होतो? 

- थेट शारीरिक संपर्क, शरीरद्रव, लैंगिक संपर्क किंवा जखम, घाव यातील स्त्रव

- अप्रत्यक्ष संपर्क, बाधित व्यक्तीने वापरलेल्या कपड्यांमार्फत

- जर खूप वेळ बाधित व्यक्तीचा संपर्क आला तर श्वसन मार्गातून बाहेर पडणाऱया मोठ्या थेंबावाटे 

- बाधित प्राणी चावल्यामुळे किंवा बाधित प्राण्याचे मांस न शिजवता खाण्यामुळे देखील या आजाराचा संसर्ग होऊ शकतो. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group