देवळ्यात एकाच रात्री 4 ठिकाणी घरफोड्या
देवळ्यात एकाच रात्री 4 ठिकाणी घरफोड्या
img
दैनिक भ्रमर
देवळा : महिनाभरापूर्वीच अज्ञात चोरट्यांनी तालुक्यातील वाजगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास १४ दुकाने फोडल्याची घटना घडल्यानंतर गुरुवारी पहाटे वाजगाव येथे भरवस्तीत असलेली चार घरे फोडण्याची घटना घडल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. सदर घटनेत एकूण ६४ हजार रूपयांची रोकड लंपास करण्यात आली आहे. देवळा शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

 ऑगष्ट महिन्यात  वाजगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात १४ दुकानांचे शटरचे कुलूप तोडून गल्ल्यातील रोकड लंपास केल्याची घटना घडली होती. ह्या चोरट्यांचा पोलिस शोध घेत असतांनाच गुरूवार दि. १९ रोजी पहाटे अंदाजे तीन वाजेच्या सुमारास वाजगाव येथे भरवस्तीत असलेले हरी मुरलिधर देवरे, प्रविण दिनकर देवरे, रमेश वाघमारे, दिपक शेळके यांची घरे अज्ञात चोरट्यांनी  फोडण्याची घटना घडली आहे. घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला, हरी देवरे यांच्या घरातील कपाटातून ६० हजार रूपये व प्रविण देवरे यांच्या घरातून ४ हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली असून घरातील सामान विस्कटण्यात आले आहे.यावेळी हरी देवरे यांच्या घराशेजारी राहणाऱ्या एका युवकाला अचानक जाग आली व हे संशयित इसम त्याला गल्लीत फिरतांना दिसले.  युवकाने त्यांना हटकले असता सर्व जण फरार झाल्याची माहिती नागरीकांनी दिली.

 सदर घटनेची माहीती वाजगावच्या पोलिस पाटील नीशा देवरे यांनी देवळा पोलिस ठाण्यात कळविल्यानंतर पोलिस हवालदार जगताप व हवालदार गवळी तातडीने अर्ध्या तासात  वाजगाव येथे घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घरफोडी झालेल्या सर्व घरांची पाहणी करून नागरीकांकडून माहीती घेतली. हरी देवरे, व प्रविण देवरे यांनी देवळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आर.पी.गवळी करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group