१० सप्टेंबर २०२४
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- उत्तर महाराष्ट्रातील मिनी सिव्हिल हॉस्पिटल म्हणून ओळखल्या जाणार्या येथील हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयात रुग्णावर उपचार होत नसल्याचा आरोप करून रुग्ण व त्याचा मुलगा यांनी डॉक्टरांना मारहाण करून महिला डॉक्टरसह वैद्यकीय कर्मचार्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याने रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, सेविका व वॉर्डबॉय यांनी काम बंद आंदोलन केले.
या रुग्णालयामध्ये नाशिकरोड, नाशिकसह निफाड, सिन्नर, इगतपुरी, पेठ व सुरगाणा या आदिवासी भागांतून रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. या भव्यदिव्य रुग्णालयात रुग्णसंख्येच्या तुलनेत विविध तज्ज्ञ डॉक्टर व परिचारिका व सेविकांचे संख्याबळ तुलनेने कमी आहे. त्यामुळे त्यांच्या कामावर मोठा ताण पडतो. रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या वैद्यकीय सूत्रांनी सांगितले, की पहिल्या मजल्यावरील अपघात विभागात अभय रमणलाल संघवी यांना दाखल करण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना उपचार करून एक्स रे काढण्यासाठी सांगितले.
एक्स रे विभाग हा तळमजल्यावर असल्याने रुग्णाच्या मुलाने “आम्हाला खाली-वर करण्यास सांगतात व आमच्यावर योग्य उपचार होत नाहीत,” असे म्हणून परिचारिका हिरा गांगुर्डे व तेथील सेविका श्रीमती धुमाळ यांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी तेथे रुग्णतपासणीसाठी आलेले डॉ. जितेंद्र धनेश्वर यांना धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली व या अपघात विभागाची तोडफोड केली.
यावर रुग्णालयात काम करणारे सर्व संतप्त कर्मचारी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसत मुख्य प्रवेशद्वाराजवळ आले. सकाळी बाह्यरुग्ण तपासणीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते; मात्र डॉक्टर निघून गेल्याने रुग्णांचे प्रचंड हाल झाले. या ठिकाणी पोलीस चौकी तत्काळ देण्यात यावी व हल्लेखोरांना कडक शासन करावे, अशी मागणी त्यांनी केली.
घटनेची माहिती कळताच आरोग्य अधिकारी तानाजी चव्हाण व माजी नगरसेवक जगदीश पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलन मागे घेण्याची मागणी केली. नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुकदेव काळे, अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी रुग्णासह त्याच्या मुलास ताब्यात घेतल्याचे समजते.
सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने सर्व पोलीस बंदोबस्तात आहेत. गणेशोत्सव झाल्यानंतर हॉस्पिटल परिसरात पोलीस चौकी देण्याचे आश्वासन आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिले. हे आश्वासन मिळल्यानंतर डॉक्टरांनी आपले आंदोलन स्थगित केले. मात्र, गणेशोत्सवानंतर चौकी मिळाली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला.
Copyright ©2025 Bhramar