राज्यात लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटना सुरुच आहे. महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. बदलापूरमधील शाळेतील मुलींवर झालेला अत्याचार असो की राज्यभरातील वेगवेगळ्या शहरातील घटना , मुली-महिला अत्याराला बळी पडतानाच दिसत आहेत. नराधम गुन्हेगारांना कायद्याचा काही धाकच उरलेला नाही. त्याच दरम्यान मुंबईतील चेंबूरमध्येही असाच अत्याचाराचा प्रकार घडल्याचे उघडकीस आलंय.
अवघ्या 13 वर्षांच्या मुलीवर एका रिक्षाचालकाची वाईट नजर पडली आणि त्याने तिच्यावर हात टाकला. या अज्ञात रिक्षाचलाकाविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अवघी 13 वर्षांची असून ती शाळेत जात होती. त्यावेळी आरोपी , नराधम रिक्षा चालकाने तिच्यावर हात टाकला. तो तिला एका पडक्या इमारतीमध्ये घेऊन गेला आणि तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. घडलेल्या घटनेबद्दल आईला किंवा अन्य कोणालाही सांगू नकोस, नाहीतर तुझ्या आईला मारून टाकेन अशी धमकीही त्याने त्या मुलीला दिली.
भेदरलेल्या पीडित मुलीने कसंबसं घरं गाठलं. तिची अवस्था पाहून पालकांनी खोदून-खोदून तिला प्रश्न विचारल्यावर तिचा बांध फुटला आणि तिने तिच्यासोबत घडलेला भयानक प्रकार त्यांना सांगितला. ते ऐकून तिचे पालकही हादरले. त्यांनी तातडीने पोलिस स्टेशनमध्ये धावे घेतली आणि घडलेली घटना सांगत तक्रार दाखल केली.
त्यानंतर पोलिसांनी अज्ञात रिक्षचालकाविरोधात विनयभंग तसेच बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यांतर्गत (पॉक्सो) गुन्हा दाखल केला असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.