आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. दरम्यान , विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या आढावा घेण्यासाठी राज्यात आलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाने शुक्रवारी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. याच चर्चेचा तपशील केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला. केंद्रीय निवडणूक आयोगाने या पत्रकार परिषदेत सर्वकाही स्पष्ट केलं आहे. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाने एक निर्णय घेत उमेदवार आणि राजकीय पक्षांची गोची केली आहे.
विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना शपथपत्रात त्यांची वैयक्तिक माहिती, गुन्हे दाखल असल्यास त्याबाबतची माहिती, स्थावर आणि जंगम मालमत्तेबाबतची माहिती द्यावी लागते. आता या निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना त्यांच्या गुन्ह्यांबाबत वृत्तपत्रातून तीनदा माहिती द्यावी लागणार आहे. त्याबाबत माध्यमांमधून माहिती द्यावी लागणार असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.
बहुतेक वेळा राजकीय पक्ष गुन्हे दाखल असलेली व्यक्ती उमेदवार म्हणून जाहीर करतात. हेच लक्षात घेऊन ज्यांच्या विरोधात कोणतीही क्रिमिनल केस सुरू असेल त्यांना तीनदा वृत्तपत्रात माहिती द्यावी लागेल, तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांत देखील जाहिराती द्यावी लागेल, अशा स्पष्ट शब्दात निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना बजावले आहे. तसेच संबंधित पक्षाला देखील आपण संबंधित व्यक्तीला उमेदवारी का दिली, हे सांगावे लागेल आणि त्यावरील गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दलची माहिती 3 दिवसांत सादर करावी लागेल, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.