भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील यांचे निधन झाले आहे. रात्री 10.27 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून ज्ञानेश्वर पाटील हे दीर्घ आजारांमुळं पुण्यात उपचार घेत होते. उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला आहे.
एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ज्ञानेश्वर तात्या पाटील यांची ओळख होती. ग्रामीण भागात त्यांना मोठ्या प्रमाणात माननारा वर्ग होता. येणारी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची देखील चर्चा सुरु होती. धारशिव जिल्ह्यात ज्ञानेश्वर पाटील यांनी कार्यकर्त्यांचं जाळ निर्माण केलं होतं.
ज्ञानेश्वर पाटील यांची राजकीय कारकीर्द
सुरुवातीच्या काळात त्यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. अशा परिस्थितीत त्यांनी प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपवर चालक म्हणून काम केले होते. याच काळात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी शिवसेनेचे कार्य करण्यास सुरुवात केली होती. संघटनेत विविध पदे भूषवित असताना त्यांना 1995 व 1999 साली विधानसभेवर मतदारांनी निवडून दिले होते. तत्पूर्वी ते बिनविरोध नगरसेवक म्हणूनही निवडून आले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त रात्री उशिरा धडकताच परंडा मतदारसंघात शोककळा पसरली.