विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी प्रचारसभांना सुरुवात झाली आहे. प्रत्येक पक्षाच्या नेत्यांचा विविध ठिकाणी दौरा होत आहे. अमरावतीत देखील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
बडनेरा विधानसभेचे आमदार रवी राणा हे देखील कामाला लागले आहेत. त्यांच्यासह माजी खासदार नवनीत राणा या देखील प्रचंड काम करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत आपले पती रवी राणा जिंकून यावेत यासाठी नवनीत राणा प्रयत्नशील आहेत. एकीकडे राणा दाम्पत्य निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत तर दुसरीकडे त्यांचं मानसिक खच्चिकरण करण्याचा प्रयत्न अज्ञात इसमांकडून केला जातोय.
अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नवनीत राणा यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रात नवनीत राणा यांच्या विरोधात अतिशय खालच्या पातळीच्या आणि अश्लील भाषेचा उल्लेख आहे.
त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त केला जातोय. या प्रकरणी पोलीस काही कारवाई करतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.