१ फेब्रुवारी २०२५
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- मायनिंगच्या व्यवसायात भागीदारी देण्याचे आमिष दाखवून पोकलेन मशीन व डंपर स्टोन क्रशरचे संपूर्ण युनिट स्वत:च्या व्यवसायासाठी वापरून एका इसमाची अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ठाण्याच्या एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी संजीव शंकर आव्हाड, मीना संजीव आव्हाड व कार्तिक संजीव आव्हाड (सर्व रा. कैलासनगर, वालीवली, बदलापूर, जि. ठाणे) यांनी संगनमत करून फिर्यादी संजय शांताराम सांगळे (रा. कॅनडा कॉर्नर, नाशिक, मूळ रा. मनमाड) यांच्याशी संपर्क साधला व सांगळे यांना बांधकाम व्यवसायासाठी लागणारे दोन जेसीबी मशीन, दोन पोकलेन मशीन व चार डंपर, स्टोन क्रशरचे संपूर्ण युनिट, तसेच मायनिंगच्या व्यवसायात भागीदारी देण्याचे आमिष दाखविले.
फिर्यादी सांगळे व आरोपी आव्हाड हे एकमेकांचे परिचित असल्याने सांगळे यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला व आरोपींच्या प्रस्तावाला होकार दिला. त्यानंतर आव्हाड कुटुंबीयांनी फिर्यादी सांगळे यांच्याकडून अडीच कोटी रुपयांची रक्कम स्वीकारली. त्यानंतर या रकमेचा स्वत:च्या वैयक्तिक फायद्याकरिता व व्यवसायाकरिता वापर केला, तसेच जेसीबी, पोकलेन मशीन, वाहन व इतर साहित्य परत न देता सांगळे यांची अडीच कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार फेब्रुवारी ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत कॅनडा कॉर्नर, एसक्यू बिझनेस सेंटर येथे घडला.
या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात आव्हाड कुटुंबीयांविरुद्ध फसवणुकीचा गुुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक जानकर करीत आहेत.
Copyright ©2025 Bhramar