१ फेब्रुवारी २०२५
नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- घराचा मुख्य दरवाजा कशाच्या तरी सहाय्याने तोडून घराच्या समोरच राहणार्या महिलेने चार तोळे सोन्याच्या दागिन्यांसह पैंजण, महागड्या साड्या, रोख रक्कम, तसेच सौंदर्यप्रसाधने असा 2 लाख 87 हजारांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार त्रिमूर्ती चौकात घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी शंकर भगवानसिंग लाल व आरोपी अनुराधा अमोल चौहाण (दोघेही रा. उंटवाडी रोडजवळ, त्रिमूर्ती चौक, नाशिक) हे एकमेकांच्या घरासमोर राहतात.
फिर्यादी लाल हे अंबड एमआयडीसी कंपनीत खासगी नोकरी करतात. त्यांच्या पत्नी प्रभा लाल या दि. 30 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास सामान खरेदी करण्यासाठी त्रिमूर्ती चौकातील मार्केटमध्ये गेल्या होत्या. फिर्यादी लाल हे साडेतीन वाजेच्या सुमारास घरी येत असताना त्यांच्या पत्नी त्रिमूर्ती चौकात भेटले.
ते दोघे जण सोबत घरी आले. त्यांच्या घराच्या दरवाजाचे लॅचलॉक दोन वेळा फिरविल्यावर लॉक होते आणि दोन वेळा फिरविल्यावर उघडते; मात्र त्या दिवशी एकदा चावी फिरविल्यावर दरवाजा उघडला, तेव्हा त्यांना संशय आला. त्यानंतर घरात लाल यांनी घरात जाऊन सीसीटीव्ही चेक केले असता त्यांना साडेअकरा वाजता फ्लॅटसमोर राहणारी संशयित महिला अनुराधा अमोल चौहाण ही लाल यांच्या फ्लॅटच्या दुकानातून प्रवेश करीत असल्याचे सीसीटीव्हीत दिसले.
त्यांनी घरातील बेडरूममध्ये असलेल्या लॉकरमध्ये ठेवलेले सामान व्यवस्थित आहे की नाही, याची पाहणी केली असता त्यात 28 ग्रॅम वजनाची 84 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन, 33 हजार रुपये किमतीची 11 ग्रॅम वजनाची कानातील रिंग, तीन हजार रुपये किमतीच्या दोन महागड्या साड्या, 19 हजार रुपये किमतीचे 380 ग्रॅम वजनाचे चांदीचे पैंजण, तीन हजार रुपये किमतीचे सीताफळ फेस क्रीम, परफ्यूमची एक डबी, तसेच 1 लाख 43 हजार रुपयांची रोख रक्कम अशी एकूण 2 लाख 87 हजार रुपयांच्या ऐवजाची चोरी झाल्याचे लक्षात आले.
ही चोरी फ्लॅटसमोर राहणार्या अनुराधा चौहाण या महिलेनेच केल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले असून, या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright ©2025 Bhramar