ऐन दिवाळीत अवकाळीचं सावट, या जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता?
ऐन दिवाळीत अवकाळीचं सावट, या जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता?
img
Dipali Ghadwaje
मुंबई : मागील दोन दिवसांत मुंबईसह कोकणात काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यातच आता कोकणासह मध्य महाराष्ट्रातही वीजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. दरम्यान सर्वत्र दिवाळीचा उत्साह सुरू असताना आता त्यावर पावसाचे सावट आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

पुढील 24 तासात अनेक ठिकाणी जोरदार सरी बरसण्याचा अंदाज आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. 

मुंबईत गुरुवारी सायंकाळी अचानक झालेल्या पावसाने चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तसेच, दिवाळीनिमित्त बाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहक, विक्रेत्यांचीही धावपळ झाली. मुंबईतील पश्चिम उपनगरे तसेच मध्य उपनगरात रात्री 8 नंतर अचानक पावसाने हजेरी लावली. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. पुढील 2 दिवस मुंबईसह उपनगरात पावसाची शक्यता आहे. 

मागील दोन दिवसापासून कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस बरसत आहे.पुढील दोन दिवसही या भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणात पडत असलेल्या पावसामुळे आंबा पिकांवर मोठे संकट ओढवण्याची शक्यता आहे. मागील वर्षी नोव्हेंबर आणि  डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आंब्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यंदाही मागील दोन दिवसापासून होत असलेल्या पावसाने शेतकरी देखील चिंतेत आहे. 

मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यात पुढील 24 तासात दमदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. अल-निनो वादळाच्या संकटामुळे यंदा मान्सून काळात अत्यल्प पावसाची नोंद झाली. त्यामुळे येत्या काळात पाणीटंचाईचं संकट निर्माण झालं आहे. अशावेळी आता अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. 

दरम्यान, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई विभागात मागील दोन दिवसापासून अवकाळी पाऊस सुरु आहे.याशिवाय पुढील 24 तासात देखील दमदार पावसाचा अंदाज आहे. मात्र,तिकडे विदर्भ आणि मराठवाड्यात वातावरण कोरडेच असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group