नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- अंबड एमआयडीसी जवळील संजीवनगरमध्ये चार मोटारसायकलींवरून आलेल्या दहा ते बारा तरुणांनी आरडाओरडा करीत परिसरात दहशत माजवून रस्त्याने दिसेल त्याच्यावर चाकू, कोयते व लाकडी दांड्याने मारहाण केली.
या प्रकारात दोघे जण जखमी झाले असून, एका सोसायटीतील पार्किंगमधील वाहनांचे या तरुणांनी काचा फोडून नुकसान केले. यामुळे परिसरात दहशत माजली असून, पोलिसांनी तातडीने टवाळखोर व गुंडगिरीला आळा घालावा, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
याबाबत मोहंमद फैसल वाहिद शेख (वय 28, रा. संजीवनगर पाण्याच्या टाकीजवळ, अंबड लिंक रोड) यांनी अंबड एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे.
या तक्रारीत म्हटले आहे, की दि. 1 जून रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास शेख हे संजीवनगर पाण्याच्या टाकीजवळील रस्त्यावरून पायी जात असताना पाठीमागून चार मोटारसायकलींवरून दहा ते बारा मुले जोरात आरडाओरडा करीत आले व काहीही कारण नसताना त्यांनी त्यांच्या हातातील चाकूने माझ्या डाव्या कानावर व पाठीवर गंभीर दुखापत केली. त्याचप्रमाणे जोरजोरात आरडाओरडा करून हातात लोखंडी कोयते व चाकू घेऊन रस्त्यात जो येईल, त्याला मारहाण सुरू केली.
त्यात शेख यांच्यासमोरच मोहंमद अमिरुल शेख यालादेखील दोन्ही हातांवर व पाठीवर वार करून या तरुणांनी त्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. नंतर जवळच असलेल्या साईरुद्र अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये घुसून वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले. त्याचा आवाज ऐकताच बिल्डिंगमधील रहिवासी खाली येताच हे टवाळखोर पळून गेले.
अमिरुल शेख व मोहंमद शेख यांना त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रथमोपचार घेऊन मोहंमद शेख यांनी अंबड एम. आय. डी. सी. पोलीस चौकीत तक्रार नोंदविली.
पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 109, 189 (1), 189 (2), 109, 191 (3) आदींसह क्रिमिनल अवेअरमेंट अॅक्ट कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुगले हे करीत आहेत.