नाशिक (प्रतिनिधी) : पूर्वी राज्य परिवहन महामंडळाकडे म्हणजेच एसटी महामंडळाकडे असलेली नाशिक शहराची बस सेवा ही महापालिकेकडे हस्तांतरित झाली.
विशेषतः वाहक-चालकांचा संप ही जणू काही नित्याचीच बाब झाली आहे. मात्र आता यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने दुसरा ठेकेदार नेमण्याचा निर्णय घेतला असून याबाबत पुढील महिन्यात लगेच कारवाई होणार आहे. गरज पडल्यास तिसरा ठेकेदारही नेमला जाऊ शकतो, मात्र याबाबत अद्याप महापालिका प्रशासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही असे सांगण्यात येते.
महापालिकेच्या परिवहन महामंडळाची सिटीलिंक बससेवा ठेकेदार व कर्मचारी यांच्यातील वादामुळे अलिकडच्या काळात वारंवार बंद पडत आहे. या महिन्यात तर सलग चार दिवस बससेवा बंद राहिल्याने महापालिकेपुढे मोठी समस्या निर्माण झाली होती. त्यातून महापालिकेने नाशिकरोड विभागाच्या बस चालवण्याचा दुसरा ठेका युनिटी कंपनीला दिला आहे. याबाबत तांत्रिक प्रक्रिया पुर्ण केली जात असून त्यानंतर सप्टेंबरमध्ये नाशिकरोड डेपोच्या पूर्ण बसेस युनिटी कंपनीकडून चालवल्या जाणार आहेत. दोन ठेकेदार झाल्यामुळे भविष्यात संप झाला, तरी तो एकाच कंपनीचा होईल व दुसरी कंपनी प्रवाशांना वाहतूक सेवा देत राहील, असा विचार आहे.
सध्या शहर व सेवेत सुमारे २५० बस गाड्या असून यापैकी १५० बस गाड्या एका ठेकेदाराकडे तर दुसऱ्या १०० बसगाड्या या दुसऱ्या ठेकेदाराकडे राहणार आहेत. गरज पडल्यास तिसरा ठेकेदार नेमल्यास त्याच्याकडे ५० गाड्या वाढविण्याची शक्यता आहे, मात्र अद्याप याबाबत कोणताही विचार झालेला नाही. तपोवन डेपोसाठीही तिसरा ठेकेदार नेमण्याची तयारी महापालिकेची आहे. यामुळे भविष्यात महापालिकेच्या सिटीलिंक बससेवेच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यास संपूर्ण शहर बससेवा ठप्प होणार नाही व नागरिकांची गैरसोय टळणार आहे.
सध्या दुसरा ठेकेदार नेमण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. सुरुवातीला महापालिकेने एकच ठेकेदार नेमला होता. मात्र, संपामुळे संपूर्ण शहरातील बससेवा ठप्प होते. यामुळे दुसरा ठेकेदार नेमला. तर संपूर्ण शहरातील बससेवा ठप्प होणार नाही व प्रवाशांची अडवणूक होणार नाही, असे महापालिकेला वाटते.
सिटी लिंक या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बससेवेचा ठेका सध्या मॅक्सी कॅब या कंपनीला देण्यात आला आहे. सध्या तपोवनातील डेपोतून १५० बस व नाशिकरोड डेपोतून १०० बस ठेकेदार कंपनीच्या माध्यमातून चालविल्या जातात. या बससेवेतून महापालिकेला रोज लाखो रुपयांचा तोटा होत आहे. त्यातच ठेकेदाराने वाहकांचे जुलै महिन्याचे वेतन दिले नाही, त्यामुळे चार दिवस संप करण्यात आला. यामुळे शहरातील प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार वेठीस धरले गेले. तसेच या बससेवेच्या विश्वासार्हतेवर त्याचा परिणाम झाला होता. मात्र यापुढे असा प्रकार घडणार नाही असा विश्वास मनपा प्रशासनाला वाटत आहे.