नाशिक स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांची बदली
Dipali Ghadwaje
नाशिक ( प्रतिनिधी)- नासिक स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांच्या बदली झाली असून त्यांच्या जागेवर नाशिकचे माजी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते गुरुवारी आपल्या पदाचा पदभार घेणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
नाशिक स्मार्ट सिटी प्रकल्पाचे नेहमीच कार्य हे वादात सापडलेले आहे. या प्रकल्पाचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले प्रकाश थवील हे ही वादात सापडल्याने त्यांची बदली करण्यात आली होती. त्यावेळी महानगरपालिकेत असलेल्या नगरसेवक आणि इतर सामाजिक संस्थांनी केलेल्या आंदोलन आणि निवेदनामुळे थवील यांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर पहिल्यापासून काही आरोप असलेले सुमंत मोरे यांना पुनर्नियुक्ती देऊन नियुक्त करण्यात आले. परंतु त्यांची ही कारकीर्द ही वादग्रस्त राहिली.
नको त्या कामांमध्ये त्यांनी हस्तक्षेप केला आणि अनेक कामांचा चेहरा मोहरा त्यांनी बदलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सुमंत मोरे यांची कारकीर्द देखील वादग्रस्त राहिली. त्यांच्या कामकाजाबाबत नाशिकमधील चारही आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन अखेर मोरे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर सध्या अमरावती येथे कार्यरत असलेले उपजिल्हाधिकारी आणि नाशिक मध्ये निवासी उपजिल्हाधिकारी राहिलेले भागवत डोईफोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.