मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. राज ठाकरेंनी गुरुवारी पदाधिकारी कार्यकर्त्यांची झाडाझडती घेत, गट तट विसरून कामाला लागण्याच्या सूचना केल्या होत्या. आजही पदाधिकारी बैठक घेणार आहेत. दरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यावर भाष्य केले.
“मागच्या काही महिन्यांपासून मनसेचे पदाधिकारी अनेक मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. कोणत्या मतदारसंघात निवडणूक लढवावी आणि कुठे लढवू नये, याचा आढावा घेतला जात आहे. ज्यांच्या हातात केंद्र आणि राज्याची सत्ता आहे, तेही अशाप्रकारची चाचपणी करतात. मग आम्ही केली तरी काय हरकत आहे”, असे राज ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले.
तसेच २०१४ साली नरेंद्र मोदी यांच्यासारखा पंतप्रधान व्हावा, असा प्रचार राज ठाकरे यांनी केला होता. त्यामुळे यावेळी पंतप्रधानपदी कोणता नेता असावा?
असा एक प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला. यावर राज ठाकरेंनी आपल्या खुमासदार शैलीत उत्तर दिले.
काय म्हणाले राज ठाकरे?
“२०१४ साली मी पंतप्रधान मोदींना पाठिंबा दिला नव्हता. त्यांच्यासारखा व्यक्ती पंतप्रधानपदावर असावा, अशी फक्त इच्छा व्यक्त केली होती. यावेळी तसा काही विचार केलेला नाही. पंतप्रधानपदी कोण असावा? याची चाचपणी सुरू आहे. माझी चाचपणी झाली की सांगेन”, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.
महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, त्यांच्या आघाडीचे काहीही भवितव्य नाही. नितीश कुमार यांच्याच आघाडीत होते. त्याचे काय झालं? असा प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे यांनी एका व्हायरल केलेल्या व्यंगचित्राचा दाखला दिला. या व्यंगचित्रातले दोन आय काढून टाकला होता. त्यामुळेत त्यात फक्त एनडीए उरले होते.