मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारमात एकच खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर आमदार रवी राणा यांनी मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे.
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत आणखी काही आमदार राजीनामे देणार असल्याची चर्चा आहे. आता भाजप आमदार रवी राणा यांच्या वक्तव्यानंतर मोळी खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाणांच्या पाठोपाठ तीवसा मतदारसंघाच्या आमदार तथा काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर ह्या सुद्धा भाजपच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा, आमदार रवी राणा यांनी एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलताना केला आहे.
आमदार रवी राणा म्हणाले, अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे 10 ते 15 आमदार संपर्कात आहे. मी या आधी पण सांगितलं होतं की, काँग्रेसमध्ये मोठा भूकंप होणार आहे. 15 फेब्रुवारीला अमित शहा हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. तेव्हा तुम्हाला आणखी मोठे धक्के पाहायला मिळेल. उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि शरद पवार गटामध्ये मोठे धक्के पाहायला मिळेल, राहिलेले पक्ष सुद्धा खाली होणार आहे.
दरम्यान यशोमती ठाकूर यांच्या भाजप प्रवेशाबाबत बोलताना रवी राणा म्हणाले, तीवसा मतदारसंघाच्या आमदार तथा काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर या सुद्धा भाजपच्या संपर्कात आहे. मात्र भाजपने त्यांना थांबायला सांगितलं आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघ सुद्धा खाली होणार आहे, असे देखील रवी राणा म्हणाले.