नाशिक (प्रतिनिधी) : मराठा आरक्षाणाच्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करावे, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी गेल्या 5 दिवसांपासून आंतरवली सराटी येथे अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे.
त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी तसेच मराठा आरक्षणाच्या कायद्यात रुपांतर करावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जिल्हा सकल मराठा समाज बांधवांनी आज सिडकोतील त्रिमूर्ती चौक येथे लाक्षणिक उपोषणास सुरू आहे.
सध्या राज्य सरकार हे मराठा समाजाची फसवणूक करत असून मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी राज्य सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलवावे, अन्यथा मराठा समाजाच्या वतीने मराठा आमदार आणि मंत्री यांना राज्यात फिरू दिले जाणार नाही. आम्ही आज शांततेत उपोषण आणि लाक्षणिक आंदोलन करत आहोत, याची सरकारने दखल घ्यावी, असे आवाहन ही सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
या उपोषणात जिल्हाध्यक्ष आशीष हिरे, विजय पाटील, संजय भामरे, योगेश गांगुर्डे, योगेश पाटील, पवन मटाले, विशाल पगार, हरीश पाटील, गौरव भदाणे, जितेंद्र पाटील, अमोल पाटील, गोपी पगार आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नाशिकसह येवला, मनमाड, नांदगाव शहरात बंद पाळण्यात आला आहे. या बंदमुळे सकाळपासून गजबजलेल्या रस्त्यांवर शुकशुकाट पसरला असून या बंद मधून हॉस्पिटल, मेडिकल व अन्य जीवनावश्यक वस्तूंची दुकाने मात्र वगळण्यात आली आहे. राज्यात असा बंद ठिकठिकाणी आहे.