सखाराम कडू ठाकरे (वय 56, रा. राधेय हौसिंग सोसायटी, पाचोरा, जळगाव) असे लाच घेणाऱ्या सहकारी संस्था (प्रक्रिया), धुळे येथील विशेष लेखा परीक्षकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की ठाकरे हे यावल येथील महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे अवसायक आहेत. या पतसंस्थेच्या व्यापारी संकुलातील तक्रारदाराचा एक गाळा पतसंस्थेच्या कबजात आहे. या गाळ्याची अनामत रक्कम तक्रारदार यांच्या नावावर वर्ग करून देण्यासाठी ठाकरे याने तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. नंतर विभागाने सापळा रचला असता काल ठाकरे यांना पाच लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षिका शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील, पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, रूपाली खांडवी, पोलीस हवालदार राजन कदम, शरद काटके, पोलीस शिपाई संतोष पावरा, रामदास बारेला, गायत्री पाटील, प्रशांत बागूल, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, सुधीर मोरे यांनी केली. ठाकरे यांच्यावर धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.