नवी दिल्ली : तमिळनाडूच्या मदुराईमधून एका ११ वर्षीच्या मुलीसोबत घडलेला धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भारतीय लष्करामध्ये अधिकारी असलेल्या एका व्यक्तीने आपल्या अल्पवयीन भाचीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या केली आहे. संतापजनक म्हणजे या कामामध्ये अधिकाऱ्याच्या पत्नीने देखील त्याला साथ दिली आहे. जोडप्याने ही घटना दाबण्याचा प्रयत्न केला आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, २२ मार्च रोजीची ही घटना आहे. भारतीय लष्करातील अधिकारी सुभेदार पदावर जम्मू आणि काश्मिरमध्ये तैनात आहे. सुट्टीवर आल्यानंतर त्याने हे कृत्य केलं आहे. अधिकाऱ्याच्या पत्नीने ११ वर्षाच्या मुलीला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणलं होतं. डॉक्टरांनी अल्पवयीन मुलीला मृत घोषित केलं. त्यानंतर यासंदर्भात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. तपासानंतर पोलिसांना धक्कादायक माहिती समजली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या आईचा लहानपणी मृत्यू झाला होता. वडिलांनी मुलीचा त्याग केला होता. त्यानंतर काकीने मुलीला दत्तक घेतले होती. पण या लहान मुलीवर तिच्या पतीकडून लैंगिक अत्याचार सुरु होते. २२ मार्च रोजी पीडितेला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं.
यावेळी ती बेशुद्ध होती. मुलगी बेशुद्ध अवस्थेत सापडल्याचा काकीचा दावा होता. मुलीला तपासल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. डॉक्टरांना संशय आल्याने त्याने पोलिसांना यासंदर्भातील माहिती दिली होती. पॉस्टमार्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली. मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं आणि तिचा श्वास गुदमरुन मृत्यू झाल्याचं समोर आलं.
पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला. त्यानंतर काकाने मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे त्यांना आढळून आले. तसेच त्याने मुलीचा गळा दाबून ठार केल्याचं उघड झालं. धक्कादायक म्हणजे या लैंगिक अत्याचाराबाबत संपूर्ण माहिती त्याच्या पत्नीला होती. पण, तिने हे सर्व लपवण्याचा प्रयत्न केला. मुलीने घटनेची आपबीती काकीला सांगितली होतं. पण, तिने उलट ही घटना लपवण्याचा प्रयत्न केला असं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी याप्रकरणात जोडप्याविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.