देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू असताना विरोधक-सत्ताधारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच ग्रामीण भागात भाजपला मिळणारा पाठिंबा पाहून अक्काची झोप उडाली आहे. आता झोप यायची असेल तर झोपेची गोळी घ्यायला पाहिजे किंवा एक पेग जास्त घ्यायला पाहिजे, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे माजी आमदार संजय पाटील यांनी कर्नाटकच्या महिला बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याविषयी केल्याने खळबळ उडाली आहे.
भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य करून ऐन निवडणुकीच्या धामधुमीत वाद ओढवून घेतला आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यासपीठावर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, खासदार मंगल अंगडी यांच्यासह भाजपची नेते मंडळी उपस्थित होती.
बेळगावमधील हिंडलगा येथे शनिवारी (दि. १३ एप्रिल) भाजपाचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात संजय पाटील म्हणाले, “बेळगाव मतदारसंघात भाजपाला महिलांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना धडकी भरली आहे. त्यांना रात्रीची झोपही लागत नसेल. तसेच माजी मंत्री रमेश जारकीहोळी आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे रात्री झोप लागण्यासाठी हेब्बाळकर यांना एक पेग जास्तीचा घ्यावा लागत असेल.”
दरम्यान संजय पाटील यांच्या टीकेनंतर लक्ष्मी हेब्बाळकर यांनी एक व्हिडिओ प्रसारित करत प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, भाजपाच्या माजी आमदाराने फक्त माझाच नाही तर राज्यातील सर्व महिलांचा अपमान केला आहे. भाजपाचा महिलांप्रती दृष्टीकोन कसा आहे? हे यातून दिसून येते. भाजपाचे नेते राम नामाचा जप करतात, बेटी बचावो, बेटी पढाओ म्हणतात, पण हे सर्व वरकरणी आहे. भाजपाच्या मनात काय आहे? हे संजय पाटील यांच्या ओठावर आले आहे.
बेळगाव लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षातर्फे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल हेब्बाळकर हे भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.
दरम्यान संजय पाटील यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या शेकडो महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी धडक दिली. घोषणाबाजी करत संजय पाटील यांनी हेब्बाळकर यांची माफी मागावी, अशी मागणीही या महिलांनी केली.