नाशिकरोड (प्रतिनिधी):- माजी मंत्री बबन घोलप यांना निवडणूक लढण्यास कायदेशीर अडचण असून ती त्यांनी दूर केल्यास घोलपांची अडचण दूर केली जाईल असा विश्वास शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी "भ्रमर" शी बोलतांना व्यक्त केला.
शिर्डी लोकसभा निवडणूकी साठी बबन घोलप यांची पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवड केली होती. तेथील संपर्क प्रमुख म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. घोलप यांनी शिर्डी लोकसभा कार्यक्षेत्र पिंजून काढले आणि पक्ष पदाधिकारी यांच्या नव्याने निवड करून "शिवसेनामय" वातावरण निर्माण केले होते. मात्र माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांना शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची दिशाभूल करून प्रवेश केल्याचा आरोप घोलप यांनी करून आपल्या उपनेते पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे राजकीय खळबळ उडाली होती.
राजीनाम्याच्या दुसऱ्या दिवशी घोलप यांनी नेते खा. राऊत यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली होती. त्यांनी दोन दिवसात निर्णय घेऊ असे सांगितल्याने आज चार दिवस उलटले तरी काही निरोप नाही यामुळे पदाधिकारी कार्यकर्ते गोंधळात पडले होते. घोलप यांनी मुबंई येथे चर्मकार समाजाचा राज्य मेळावा मुबंई येथे रविवारी आयोजित केला आहे. त्यामुळे गोंधळात अधिक भर पडली.
यासाठी दै भ्रमर च्या प्रतिनिधी यांनी नेते खा. संजय राऊत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, घोलप मेळावा घेत असतील तर चांगली बाब आहे. घोलप यांची कायदेशीर लढाई सुरू आहे. कायद्याच्या अडचणी आहेत. कायदेशीर अडचणी दूर करता येतील का?ही अगोधर माहिती घ्या. न्यायालयाने त्यांना निवडणूक बंदी केली आहे. ही बंदी अद्याप पर्यंत उठलेली नाही. घोलप यांनी आम्हाला सांगितले की, मला न्यायालयाचा "रिलीफ"मिळणार आहे. आम्ही तो रिलीफ मागितला आहे. उलट घोलप यांनी या साठी एक दोन महिन्यांच्या वेळ मागितला आहे. नाशिक मध्ये कार्यकर्ते संभ्रमात असल्याचे विचारले असता नाशिक मध्ये कार्यकर्ते संभ्रमात नाही असेही शेवटी राऊत यांनी सांगितले.
दरम्यान बबन घोलप हे चर्मकार समाजाच्या मेळाव्यात काय भूमिका घेतात, या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.