नाशिकमध्ये ठाकरे गटात बंडखोरी, विजय करंजकर यांनी भरला अपक्ष अर्ज
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंडखोरी, विजय करंजकर यांनी भरला अपक्ष अर्ज
img
Dipali Ghadwaje
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे प्रणीत शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी करत जिल्हाध्यक्षपद भूषविलेले विजय किसन करंजकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अखेरचा दिवस असताना ठाकरे गटात बंडखोरी झाली असून करंजकर हे आपली उमेदवारी कायम ठेवणार, की माघार घेणार, हे उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. त्यांनी अर्ज माघारी घेतला नाही, तर अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांना फटका बसू शकतो.

लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून विजय करंजकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित होती; पण अचानक ठाकरे गटाने माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे करंजकर नाराज झाले. त्यांनी अद्यापपर्यंत ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभाग घेतला नाही. त्यांना मातोश्रीवरूनही बोलावणे आले होते. पण, ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीलाही गेले नाही. त्यामुळे त्यांची नाराजी अद्यापपर्यंत दूर झालेली नाही.

करंजकर हे गेल्या वेळीसुद्धा लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी  सुद्धा इच्छुक होते; पण त्यावेळी हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली. यावेळेस गोडसे हे शिवसेना शिंदे गटात गेल्यामुळे करंजकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. त्यांनी मतदारांशी संपर्कसुद्धा सुरू केला होता; पण त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी आता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group