नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- किरकोळ कारणातून वाद घालून चार वाहनांची तोडफोड करणार्या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की खडकाळी येथील काही तरुण द्वारका परिसरातील बजरंगवाडी येथे जात होते. त्यावेळी बजरंगवाडीत एका वाहनचालकाशी या तरुणांचा वाद झाला. या वादाचे पर्यवसान दगडफेकीत झाले. या वादातून परिसरातील चार वाहनांची तोडफोड करून नुकसान करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
ही माहिती मुंबई नाका पोलीस ठाण्यात कळली असता दंगानियंत्रण पथकासह पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, काही तरुणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.