मुख्यमंत्रिपदावरुन महायुतीत आदळआपट? नेमकं काय घडले वाचा सविस्तर....
मुख्यमंत्रिपदावरुन महायुतीत आदळआपट? नेमकं काय घडले वाचा सविस्तर....
img
Dipali Ghadwaje
राज्याचे दोन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर राज्यभर लावण्यात आले होते. अजित पवारांना शुभेच्छा देणाऱ्या पोस्टर्समध्ये भावी मुख्यमंत्री असा उल्लेख कार्यकर्त्यांनी केला.

तर दुसरीकडे फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यांची चर्चा रंगली. त्यातच शिंदे गटाकडूनही काही वक्तव्य समोर आली आहेत. ज्यामुळे महायुतीत काही आलबेल असल्याचे दिसत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे ‘मुख्यमंत्रिपद’ असल्याचे म्हटले जात आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, “राज्यात मुख्यमंत्री महायुतीचाच होणार” असे म्हटले होते. तर पुढील निवडणूका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवल्या जातील. त्यामुळे मुख्यमंत्रि‍पदावर आमचाच दावा असणार आहे, असे ठाण्याचे शिंदेंचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले.

तर नरेश म्हस्के हे काही पक्षप्रमुख नाहीत, असं प्रवीण दरेकर म्हणाले. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावरुन महायुतीत ठिणगी पडली आहे का? असा सवाल उपस्थित केला जातोय.

मुख्यमंत्रिपद एक आणि सवाल अनेक अशी परिस्थिती झाली आहे. मात्र, यावरुन थेट होऊ लागल्याचेही चित्र आहे. याच कारण गेल्या काही दिवसांत राज्यात घडत असलेल्या घडामोडी आहेत.

अजित पवारांच्या वाढदिवसादिवशी कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. कार्यकर्त्यांना पाच मजली केक आणला. मात्र, केकवर लिहिण्यात आलेल्या मजकुराची चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. “मी अजित आशा अनंतराव पवार महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की”, अशा आशयाचा मजकूर या केकवर लिहिण्यात आला होता.

दरम्यान, अजित पवारांनी केक कट केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्रि‍पदाबाबत भाष्य केलं. “मला कार्यकर्ते विचारतात मुख्यमंत्री कोणाचा होणार, मी सांगतो मुख्यमंत्री महायुतीचाच होणार आहे. यानंतर कोण मुख्यमंत्री आणि कोणाचा मुख्यमंत्री असा प्रश्न विचारु नका” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

दरम्यान, मुख्यमंत्रिपदावरुन देवेंद्र फडणवीस यांनी संतुलन ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिंदेंचे खासदार नरेश म्हस्के यांनी फडणवीसांच्या वक्तव्यांना केराची टोपली दाखवली. तर पुढील निवडणूका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवल्या जातील. शिवाय एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही लढणार आहोत. त्यामुळे मुख्यमंत्रि‍पदावर आमचाच दावा असणार आहे, असं नरेश म्हस्के म्हणाले. तर नरेश म्हसके पक्षप्रमुख नाहीत. तिन्ही पक्षांचे नेते प्रमुख ठरवतील. महायुतीचाच मुख्यमंत्री होईल. वाद होईल, अशी वक्तव्य नरेश म्हस्के यांनी करु नयेत. आता ते खासदार आहेत, त्यांनी जबाबदारीने बोलावे, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group