मंदा म्हात्रे, विजय चौगुले यांच्या आरोपांचे फटाके ;
मंदा म्हात्रे, विजय चौगुले यांच्या आरोपांचे फटाके ;
img
Dipali Ghadwaje
विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे, तसतसा नवी मुंबईत मिंधे गट आणि भाजपमधील कलगीतुरा रंगत चालला आहे. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे आणि मिंधे गटाचे विजय चौगुले यांच्याकडून नाईकांच्या विरोधात आरोपांचे फटाके फोडले जात आहेत.

त्यांना दोन्ही बाजूच्या वरिष्ठांकडून कोणतीही समज दिली जात नाही. त्यामुळे नाईकांची गळचेपी नेमकी कोणाच्या आदेशावरून होत आहे, यामागे देवेंद्र फडणवीस आहेत की मिंधे, असा प्रश्न नाईक समर्थकांना पडला आहे.

ऐरोली मतदारसंघात भाजपचे गणेश नाईक हे विद्यमान आमदार आहेत. मात्र त्याच मतदारसंघात आता शिंदे गटाचे विजय चौगुले यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. 

नवी मुंबईतील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेले सर्वेक्षण गणेश नाईक यांनी बंद पाडले आहे असा गंभीर आरोप चौगुले यांनी करून नवीन वाद उकरून काढला आहे. 

याप्रकरणी गणेश नाईक यांचा निषेध करण्यासाठी त्यांनी आजपासून ऐरोलीतील चिंचपाडा परिसरात उपोषणही सुरू केले आहे. ऐरोलीत हा वाद सुरू झालेला असताना बेलापूरमध्ये मात्र भाजपमध्ये अंतर्गत कलह उफाळून आला आहे. बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे या विद्यमान आमदार आहेत. मात्र या मतदारसंघात आता भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे मंदा म्हात्रे संतापल्या आहेत.

कलगीतुऱ्यावर दोन्ही बाजूने मौन

शिंदे गट आणि भाजपच्या मंदा म्हात्रे गटाने गणेश नाईक आणि त्यांच्या कुटुंबाला दोन्ही मतदारसंघात लक्ष्य केले आहे. शिंदे गटाकडून होत असलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही, तर बेलापूरमध्ये पक्षांतर्गत चाललेल्या कलहावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणालाही समज दिली नाही. दोन्ही बाजूच्या वरिष्ठांनी मौन पाळल्यामुळे गणेश नाईक यांची अवस्था दयनीय झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबईत भाजप आणि मिंधे गटात जोरदार वाद उफाळून आल्यामुळे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group