कागलमध्ये समरजित घाटगेंच्या रुपानं भाजपचा चेहरा आणि मोठा मोहरा शरद पवार पवारांच्या गळाला लागलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे खास निकटवर्तीय अशी घाटगेंची ओळख. मात्र भाजपला अखेर ज्या गोष्टीची भीती होती तेच आता कोल्हापुरात घडणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे कागलचे नेते समरजित घाटगे अखेर आता भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देणार आहेत. समरजित घाटगे गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. त्यांची मनधरणी करण्याचे अनेकदा भाजपकडून प्रयत्न करण्यात आले.कारण समरजित घाटगे यांनी स्वत: एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देत असताना आपण राष्ट्रवादी शरद पवार गटात जाणार असल्याचं स्पष्ट केलं
समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. 2019 च्या निवडणुकीत भाजपनं घाटगेंना तिकीट नाकारलं होतं. तेव्हा घाटगेंनी मुश्रीफांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. या निवडणुकीत मुश्रीफांनी घाटगेंचा पराभव केला. अजित पवारांसोबत हसन मुश्रीफ देखील महायुती सरकारमध्ये सामील होऊन मंत्री झाले. तेव्हापासून घाटगे नाराज होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मुश्रीफांच्या उमेदवारीची घोषणा अजित पवारांनी केली. त्यामुळंच आता शरद पवारांच्या पक्षात सामील होण्याचा निर्णय घाटगेंनी घेतलाय.
दरम्यान , लोकसभा निवडणुकी आधीच शरद पवार आणि जयंत पाटील यांनी माझ्याशी संपर्क केला होता, पण युती धर्म मोडणे माझ्यासाठी योग्य नव्हतं.. त्यामुळे निवडणुकीनंतरच मी शरद पवार आणि जयंत पाटील याना भेटून तुतारी हातामध्ये घेण्याचा निश्चित केलं असं समरजितसिंह घाटगे यांनी म्हटलंय. शरद पवार हे राजकारणातले वस्ताद म्हणून ओळखले जातात. माझ्या रूपाने टाकलेला कदाचित पहिला डाव आहे. यापुढे देखील अनेक डाव ते टाकू शकतात असं देखील समरजितसिंह घाटगे यांनी म्हटलंय. देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांशी माझे मैत्रीपूर्ण संबंध कायम राहतील पण राजकारणातील संबंध संपले असं घाटगे यांनी स्पष्ट सांगितलंय.
गेल्या लोकसभा निवडणुकीत माढामध्ये शरद पवारांनी भाजपला खिंडार पाडलं. धैर्यसिंह मोहिते पाटलांना उमेदवारी देऊन खासदार म्हणून निवडून आणलं. आता समरजित घाटगेंच्या रुपानं पश्चिम महाराष्ट्रातला भाजपचा आणखी एक मोहरा पवारांनी आपल्या पक्षात आणलाय. 1999 पासून लागोपाठ पाचवेळा हसन मुश्रीफ आमदार म्हणून कागलमधून निवडून आलेत. आता या हेवीवेट मंत्र्याला चारी मुंड्या चीत करण्याची पवारांची खेळी यशस्वी होणार का, याची उत्सूकता सगळ्यांना आहे.