विठ्ठल भक्तांसाठी एक खुशखबर आहे . आत भक्तांना घरबसल्या पूजेचे ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे . पूजा बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता असावी, यासाठी मंदिर समितीकडून सप्टेंबरअखेर ऑनलाइन पूजा बुकिंग सेवा सुरू करण्यात येणार आहे.
पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दररोज विठ्ठलाच्या दोन व रुक्मिणीच्या दोन नित्यपूजा व 10 पाद्यपूजा असतात. त्याचबरोबर नैवेद्य, पोशाख व धुपारती अशा तीनवेळी 15 प्रमाणे एका दिवसात 45 तुळशी पूजा होतात. या पूजा बुकिंग करण्यासाठी 1 तारखेला भाविकांना मंदिरात येऊन पहाटेपासूनच रांगेत थांबावे लागते. यादरम्यान एकच व्यक्ती काही वेळा जादा पूजा बुकिंग करत असतात. यामुळे इतर भाविकांना संधी मिळत नसल्याची खंत व्यक्त होत होती.
पण आता मात्र सर्वांना पूजेचा लाभ घेता येणार आहे . यामुळे भाविकांना घरबसल्या देवाची पूजा बुकिंग करता येणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
पूजा बुकिंगसाठी राज्यातून भाविकांना मंदिरात येणे शक्य नाही. आणि विठ्ठलाच्या पूजा बुकिंग व्यवस्थेत पारदर्शकता यावी. यासाठी मंदिर समितीकडून संगणक प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना आपल्या घरातूनच ऑनलाईन पद्धतीने पूजेचं बूकिंग करता येईल. याचा फायदा राज्यातून आणि परराज्यातून येणाऱ्या विठ्ठल भक्तांना होणार आहे.