विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलेच तापले असून पक्षांमध्ये मोठ्या घडामोडी होताना दिसत आहेत , अशीच एक मोठी बातमी समोर आली आहे. देगलूरचे काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी अंतापूरकर यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला, यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अंतापूरकर यांच्या पक्षप्रवेशावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अशोक चव्हाणही उपस्थित होते. जितेश अंतापूरकर हे अशोक चव्हाणांच्या जवळचे मानले जातात. अशोक चव्हाण जेव्हा भाजपमध्ये आले तेव्हापासूनच जितेश अंतापूरकर यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा सुरू होती, यानंतर आता या चर्चांवर शिक्कामोर्तब झालं आहे.
दरम्यान , नांदेड जिल्ह्यात भाजपचे काम खूप जुनं आहे. अशोक चव्हाणांचा पक्षप्रवेश झाल्यामुळे आपल्याला मजबुती पाहायला मिळाली. लवकरच अशोक चव्हाणांचे जुने सहकारी भाजपमध्ये येतील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.