मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घोषित केला आहे. महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेसाठी हा सर्वात मोठा निर्णय समजला जात आहे. गेल्या दोन दशकांपासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी होत होती. अखेर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मागणीला मंजुरी दिली आहे. मराठीसह पाली, आसामी, प्राकृत आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्राने घेतलेला आहे.
“मराठी लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे. हा दिवस उजडावा याची वाट प्रत्येक मराठी माणूस पाहत होता. आम्ही गेली अनेक वर्षे यासंदर्भातील पाठपुरावा करत होता. मराठी माणसाच्या लढ्याला आज यश आले”, अशी भावना साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केली. दरम्यान, आतापर्यंत तमिळ, संस्कृत, मल्याळम, तेलगू, कन्नड आणि ओडिया या सहा भाषांना हा दर्जा मिळाला आहे. ‘रंगनाथ पठारे समिती’ने तयार केलेल्या अहवालात मराठीला अभिजात दर्जा द्यावा अशी शिफारस एकमताने केली होती.