नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- तोफेतून गोळा सोडत असताना तो निश्चितस्थळी न जाता तो जागेवरच फुटल्याने झालेल्या स्फोटात दोन अग्निवीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक अग्निवीर गंभीर जखमी झाला आहे. भारतातील अग्निवीरांच्या सरावादरम्यान झालेल्या मृत्यूची ही पहिलीच घटना आहे.
याबाबत देवळाली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, की गुरुवारी दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास इंडियन शिल्ड गन या मैदानावर फायर रेंज आर्टिलरी येथे अग्निवीरांचा सराव सुरू होता. या सरावादरम्यान बारा तोफा लावून त्यावर प्रत्येकी सात अग्निवीर गोळा फेकून आपले लक्ष्य भेदत होते. त्याच सुमारास तोफ नंबर 4 च्या तोंडी गोळा टाकला आणि तो गोळा फायर केल्यानंतर लक्ष्य केलेल्या ठिकाणी न जाता तोफेपासून काही अंतरावर तो गोळा खाली पडला व त्याचा जागीच स्फोट झाला.या स्फोटात गोहिल विश्वराज सिंग (वय 20, मूळ रा. गुजरात, ह. मु. आर्टिलरी सेंटर, नाशिकरोड), शक्किन शीत (वय 21, मूळ रा. पश्चिम बंगाल, ह. मु. आर्टिलरी सेंटर, नाशिकरोड) या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अप्पाला स्वामी (वय 20) हा जखमी झाला असून, या अग्निवीरावर सैन्यदलाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक देवरे करीत आहेत.