नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर, संजय राऊतांनी केले 'हे' भाष्य...
नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर, संजय राऊतांनी केले 'हे' भाष्य...
img
Dipali Ghadwaje
नाशिक (प्रतिनिधी) :- नाशिक शहर हे सुसंस्कृत आणि तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते; मात्र आज ते पंजाब आणि गुजरातप्रमाणे उडते नाशिक झाले आहे का ? गुन्हेगारी आणि नशेच्या विळख्यात सापडलेल्या नाशिकला या दुष्टचक्रातून सोडवावे लागेल. ‘उडते नाशिक’ला जबाबदार कोण ? नाशिकमधील गुन्हेगारी आणि नशेच्या माफियांना कोण पाठीशी घालत आहे? राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का आहेत? असा सवाल करीत ड्रग्ज माफियाविरोधात दि 20 ऑक्टोबर रोजी शिवसेनेच्या (ठाकरे गट) वतीने नाशिक शहरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मोर्चा काढण्यात येईल, अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत दिली.

यासंदर्भात पत्रकार परिषदेत विविध मुद्यांवर माहिती देताना संजय राऊत म्हणाले, की शिवसेना आणि नाशिक यांचे एक अद्भुत नाते आहे. आम्ही गोळा केलेल्या माहितीनुसार नाशिकमध्ये ड्रग माफियांचे जाळे वाढण्यासाठी राजकीय नेत्यांचे आशीर्वाद असल्याचे समोर आले आहे. नाशिकचे विद्यमान पालकमंत्री आणि नाशिकचे माजी पालकमंत्री यांचा या सर्व प्रकरणाला आशीर्वाद आहे. त्यामुळेच ललित पाटील व भूषण पाटील यांसारखे ड्रग्ज माफिया नाशिकमध्ये उदयास आले, असे सांगून ते म्हणाले, की या सर्व प्रकरणाला विरोध करण्यासाठी आता शिवसेना व्यापक आंदोलन करणार आहे त्याची सुरुवात येत्या शुक्रवारी नाशिकमध्ये शिवसेनेचा विशाल मोर्चा आयोजित करण्यात आला आहे, या मोर्चाला सामाजिक संघटना व ज्यांना या सर्व माफिया जगाला विरोध करायचा आहे, त्यांनी सहभागी व्हावे, त्यांचे आम्ही स्वागत करू, असे त्यांनी सांगितले.

संजय राऊत यांनी पुढे म्हणाले, की संपूर्ण राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली असून सरकारने नैतिकतेच्या आधारावरती बाहेर पडावे. हा मोर्चा म्हणजे सरकारला इशारा देण्यासाठी मोर्चा असून त्यातून सरकारने काही धडा घेतला नाही, तर वेळप्रसंगी मंत्र्यांच्या गाड्यांना अडवून सर्वांना धडा शिकवू, असा इशारा देऊन ते म्हणाले, की हा आमचा इशारा मोर्चा आहे यातून सुधारले नाही तर आम्ही नाशिक वाचविण्यासाठी अजून तीव्र आंदोलन करू.
यामध्ये कोणतेही प्रकारचे राजकारण नाही. फक्त सामाजिक बांधिलकी म्हणून शिवसेना रस्त्यावर उतरत आहे.कारण हे आज नाशिकमध्ये घडलं उद्या आहे, ते कोणत्याही गावात आणि कोणत्याही जिल्ह्यात घडू शकते. हे सर्व थांबविण्यासाठी म्हणूनच आम्ही आता हा इशारा मोर्चाचे आयोजन केले आहे.या सर्व प्रकरणाचे हप्ते कोणाला जात होते, यामध्ये कोण कोण सहभागी आहेत, त्यांची नावे आमच्याकडे आहेत, याचे पुरावेदेखील आमच्याकडे आहेत. आम्ही हे जनतेसमोर मांडूच; परंतु यामध्ये काही राजकीय नेते सहभागी आहेत. त्यांच्यावरदेखील सरकारने नैतिकतेच्या आधारावर दबाव टाकून राजीनामा घेतला पाहिजे, अशी भूमिका राऊत यांनी मांडली.

राज्यामध्ये सरकार हे कंत्राटी पद्धतीने चालले आहे. या सरकारला नैतिकता नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामे द्यावेत, असे स्पष्ट मत व्यक्त करून ते म्हणाले, की ज्या ज्या वेळी गृहमंत्रिपदी फडणवीस हे बसतात, त्या त्या वेळी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी वाढते आणि त्याच्या जोरावर भाजप निवडणूक लढवितो, असे सांगून संजय राऊत म्हणाले, की महाराष्ट्रामध्ये ड्रग हे गुजरातमधून येत आहे, गुजरात हा या माफियांचा मोठा अड्डा आहे आणि तो आता महाराष्ट्रात पाय पसरत आहे.

राऊत पुढे बोलताना म्हणाले, की आम्ही विकास आघाडी सरकार म्हणून बाहेर पडावे यासाठी आमच्यावर दिल्लीवरून मोठा दबाव होता; परंतु आम्ही शेवटपर्यंत महाविकास आघाडीबरोबर राहिलो व आजही आम्ही महाविकास आघाडीबरोबर आहे, असे त्यांनी सांगितले.

सध्या नाशिकमध्ये नाशिकरोड परिसरात शिंदे गावात मागील आठवड्यात ड्रगची मोठी फॅक्टरी सापडली, त्यानंतर या सर्व प्रकरणातील आरोपी पाटील याला पोलिसांनी नेपाळ सीमेवरून ताब्यात घेतले. पुणे पोलिसांच्या या कारवाईनंतर नाशिकमध्ये राजकारण तापले असून, या राजकारणामध्ये नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचे नाव समोर येत आहे, या सर्व प्रकरणाची माहिती घेण्यासाठी आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करण्यासाठी खा. संजय राऊत हे नाशिकमध्ये आले आहेत.

त्यांनी पदाधिकार्‍यांची चर्चा केल्यानंतर शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला उपनेते सुनील बागूल, बबन घोलप, अद्वय हिरे, माजी आमदार वसंत गिते, विनायक पांडे, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, देवानंद बिरारी, जयंत दिंडे, विलास शिंदे यांच्यासह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
 
इतर बातम्या
नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group