मोठी बातमी : पहिल्या यादीनंतर भाजपमध्ये बंडखोरी?
मोठी बातमी : पहिल्या यादीनंतर भाजपमध्ये बंडखोरी?
img
Dipali Ghadwaje
मुंबई : भाजपने 99 विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर बंडखोरीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. बंडखोरीचे पहिले निशाण श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून फडकावले जाण्याची शक्यता आहे. श्रीगोंदा मतदारसंघातून भाजपने विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी  प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिली आहे.

मात्र, या मतदारसंघातून भाजपच्या जुन्या पदाधिकारी सुवर्णा पाचपुते यादेखील इच्छूक होत्या. त्यामुळे प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर होताच सुवर्णा पाचपुते यांच्याकडून बंडाचा इशारा देण्यात आला आहे. भाजपने पुन्हा पाचपुते कुटुंबीयांनाच तिकीट दिल्याने त्या प्रचंड नाराज असल्याचे समजते. 

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बबनराव पाचपुते हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईतील सागर निवासस्थानी दाखल झाले आहेत. बबनराव पाचपुते आणि प्रतिभा पाचपुते हे दोघेही त्यांचा मुलगा विक्रमसिंह पाचपुते यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी आग्रही होते. मात्र, भाजपने प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर केली. 

भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच अनेक विधानसभा मतदारसंघात नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून इच्छुक असलेल्या सुवर्णा पाचपुते यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या डोळ्यात अश्रू  पाहायला मिळाले. मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडून भाजपने उमेदवारी न देता बाहेरून पक्षात आलेल्या प्रस्थापितांनाच पक्ष उमेदवारी देत आहे. पक्ष धृतराष्ट्रासारखा झाला आहे, असं म्हणत पाचपुते यांनी पक्षावर जोरदार टीका केली.

सोबतच सुवर्णा पाचपुते यांनी आपल्या कार्यालयातील भाजप नेत्यांचे फोटो आणि चिन्ह हटवले आहे. मात्र, भाजपचे चिन्ह कार्यालयातून हटवताना त्यांना भरून आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पक्षाला माझी ताकद दाखवून देण्यासाठी मी अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे आता भाजप त्यांची मनधरणी करणार का, हे पाहावे लागेल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group