मुंबई : बॉलिवूड अभिनेत्रीबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'गरम मसाला' आणि 'ब्लॅक अॅन्ड व्हाइट' या सिनेमात झळकलेली अभिनेत्री निकिता रावलच्या घरी लाखो रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली आहे.
बंदुक आणि चाकूचा धाक दाखवत घरातील नोकरानेच चोरी केली आहे. लाखो रुपये आणि दागिने घेऊन नोकर लंपास झाला आहे. याप्रकरणी अभिनेत्रीने आता मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, निकिताने मुंबईतील मालाड येथील बांगुर नरग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एका वृत्तपत्राला या प्रकरणाची माहिती देत अभिनेत्री म्हणाली,"माझ्याच घरातील नोकराने चोरी केली यावर माझा विश्वास बसत नाही. मला त्याने बंदुकीचा धाक दाखवला. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली".
दरम्यान निकिता म्हणाली की,"घरातील नोकराने सुमारे साडेतीन लाख रुपयांची रोख रक्कम, काही सोन्याचे दागिने आणि प्लॅटिनची अंगठी चोरी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून तो चोरी करत आहे. याआधी त्याने 10-15 हजार रुपये चोरले आहेत. दरोडेखोरांनी माझी 3 लाख 80 हजार रुपयांची अंगठी हिसकावून घेतली आहे. याआधी मी नोकराला चोरी करताना रंगेहात पकडले होते. त्यानंतर त्याने हाणामारी सुरू केली". याबात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण घटनेमागे घरातील नोकराचा हात आहे. प्रमोद नामक आरोपीला अटक करण्यात आली आहे.
निकिता रावलने 2010 मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केले. मिस्टर हॉट मिस्टर कूल, ब्लॅक अॅन्ड व्हाइट, द हिरो-अभिमन्यू, अम्मा की बोली या कलाकृतींमध्ये निकिता रावल झळकली आहे. 'गरम मसाला' या सिनेमामुळे निकिता चांगलीच लोकप्रिय झाली. आजवर निकिताने वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. मिस्टर हॉट मिस्टर कूल आणि गरम मसाला सारख्या सिनेमांतील अभिनयासाठी निकिताचं कौतुक झालं आहे. अभिनेत्रीच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.