नाशिक :- वाद पराकोटीला गेल्याने नवऱ्याने रागाच्या भरात राहत्या घरात बायकोच्या डोक्यात कोयता व कुकरच्या झाकणाने वार करून तिचा खुन केला. गंगापुररोडवरील डी.के नगरा परिसरातील स्वास्तिक निवास सोसायटीमध्ये ही घटना घडली.
सविता गोरे (वय ४५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. घटनेनंतर पती घरातून पळून गेला होता मात्र, गंगापूर पोलिसांनी रात्री त्यास पकडले.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, गंगापुररोड वरील डी.के.नगर भागात असलेल्या स्वास्तिक निवास या सोसायटीच्या बी-विंग मधील चौथ्या मजल्यावर गोरे दाम्पत्य हे मुलासह भाडेतत्वावर राहत होते. मुलगा हा सकाळी कामावर निघून गेल्यानंतर पती-पत्नी घरात एकटेच होते. दुपारी पती-पत्नीमध्ये भांडण झाले. यावेळी शत्रूघन गोरे (वय ५०) याने रागाच्या भरात बायकोच्या डोक्यात कोयता व कुकरच्या झाकणाने जोरदार प्रहार केला.
यामुळे सविता गोरे या रक्तबंबाळ अवस्थेत पलंगावर कोसळल्या. यावेळी त्यांची विवाहित मुलगी मुक्ता लिखे ही सिलेंडर घेण्यासाठी आली होती. घरी आल्यानंतर बराच वेळ दरवाजा वाजविल्यानंतर तिचे वडील शत्रूघन यांनी दरवाजा उघडला असता आई रक्तबंबाळ अवस्थेत बेडरूममध्ये पडलेली आढळून आली.
त्यावेळी शत्रूघन हा फरार झाला होता. मुक्ता हिने शेजाऱ्यांचे दार वाजवून मदत मागितली यावेळी रहिवाशांनी धाव घेतली आणि पोलिसांना याबाबत कळविले. या प्रकरणी मुक्ता लिखे हिच्या फिर्यादिवरून गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.