लासलगाव (वार्ताहर) :- अवैध गौण खनिजाचे हायवा मालट्रक जप्त करून लासलगाव बस आगारात महसूल विभागाने जमा केलेले असताना काल सकाळी लाखो रुपयांच्या अवैध गौण खजिनासह हा हायवा ट्रक पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे महसूल विभागासह गौण खनिज विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
लासलगावकडून कोटमगावकडे जाणारी हायवा मालट्रक क्रमांक एम. एच. 18 बी. जी. 8687 या वाहनात अवैध गौण खनिज वाहतूक होत असताना लासलगाव येथील महसूल मंडल निरीक्षक बी. एस. देवकाते आणि लासलगाव तलाठी नितीन केदार यांच्या तपासणी पथकाने शासकीय खजिन्यात स्वामीत्वधन भरलेबाबत वाहन चालकाकडे पावती मागितली असताना कोणतीही पावती उपलब्ध करून दिली नाही.
त्याबाबत गौण खनिज ॲपवर पडताळणी केली असता तशी कोणती नोंद आढळून न आल्याने महसूल अधिकारी पथक प्रमुख लासलगावचे महसूल मंडल निरीक्षक बी. एस. देवकाते यांच्या महसूल कर्मचाऱ्यांच्या पथकाने जप्त केलेले वाहन लासलगाव बस आगारात दि. 20 जानेवारी 2025 रोजी लासलगाव बस आगारात जमा करून कब्जा पावती तयार करून जप्त वाहन लासलगाव बस आगारात सुरक्षा रक्षक यांचे ताब्यात देऊन लावले.
ते काल लासलगाव बस आगारातून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या हायवा मालट्रकचे मालक काल पहाटे पाच वाजेचे दरम्यान गाडी घेऊन पळून गेले आहेत.
काल याबाबत लासलगाव बस आगाराचे सुरक्षारक्षक यांनी काल सकाळी 7.30 वाजता फोन करून महसूल अधिकारी यांना कळविले होते.