गांधीनगर येथे दुचाकीस्वार युवकाला ट्रकची जोरदार धडक – दुर्दैवी मृत्यू
गांधीनगर येथे दुचाकीस्वार युवकाला ट्रकची जोरदार धडक – दुर्दैवी मृत्यू
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) : आयुष्य भरभरून जगण्याच्या वयात एका तरुणाने दुर्दैवी मृत्यूला सामोरे जावे, यासारखी हृदयद्रावक घटना गांधीनगर येथे घडली.

नाशिकरोड येथून नाशिककडे ट्रॅक्टरची वाहतूक करणाऱ्या ट्रकने एका दुचाकीस्वार युवकाला जोरदार धडक दिली. या अपघातात सागर यशवंत हिरे (वय 31, रा. पंचक, जेलरोड) या युवकाचा जागीच मृत्यू झाला.
   
गांधीनगर परिसरातून दुचाकीवरून महामार्ग ओलांडत असताना, एम.एच. 15 के. बी. 7738 या मोटारसायकलस्वार सागर हिरेला ट्रॅक्टर वाहून नेणाऱ्या ट्रकने जबर धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, तो ट्रकच्या चाकाखाली सापडून गंभीर जखमी झाला आणि काही क्षणांतच त्याने अखेरचा श्वास घेतला.

या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. काहींनी ट्रक चालकावर संतापही व्यक्त केला. वेगवान व बेफिकीर वाहनचालकांच्या बेजबाबदारपणामुळे एका कुटुंबाचा आधार हिरावला गेला, अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शींनी दिली.

   घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि त्यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त ट्रक आणि दुचाकी जप्त करण्यात आल्या असून ट्रकचालकाविरोधात हलगर्जीपणाने वाहन चालवून मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  सागरच्या अकाली जाण्याने संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले आहे. त्याचे वडील पोटच्या गोळ्याला गमावल्याच्या दु:खात कोसळले, तर आईचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.हा अपघात  प्रत्येकाच्या मनाला चटका लावणारा ठरला.
 एक जबाबदार मुलगा, आधारवड भाऊ, आणि हसतमुख मित्र एका क्षणात काळाच्या पडद्याआड गेला...
इतर बातम्या
Join Whatsapp Group