अकोला : विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनला सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. समोरून आलेल्या ट्रकने व्हॅनला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला असून यात व्हॅनमध्ये बसलेले १० विद्यार्थी जखमी झाले असून यातील तीन विद्यार्थी गंभीर जखमी आहेत.
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पालकांनी घटनास्थळी धाव घेत रास्ता रोको आंदोलन केले. अकोल्यातल्या पातुर- बाळापूर रस्त्यावरील वाडेगाव जवळ हा अपघात सकाळी झाला.
सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत नेण्यासाठी व्हॅन मार्गस्थ झाली होती. याच वेळी बाळापूरकडून वाशिमकडे जाणाऱ्या विटांनी भरलेल्या ट्रकने विद्यार्थी बसलेल्या स्कूल वाहनाला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. ट्रकमध्ये जवळपास २० टन लोड असल्याचे समजते. यामुळे स्कूल व्हॅनचा समोरील भाग दबला गेला आहे.
या अपघातात स्कूल व्हॅनमधील जवळपास दहा विद्यार्थी जखमी झाले आहेत. तर यापैकी तीन विद्यार्थी गंभीर स्वरूपात जखमी आहेत. अपघातामुळे परिसरातील नागरिकांनी लागलीच धाव घेत विद्यार्थ्यांना बाहेर काढले. यानंतर सर्व जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.