नाशिक (प्रतिनिधी) : वाहनांची खोटी कागदपत्रे तयार करून त्यांची बेकायदेशीररीत्या विक्री करीत या वाहनांच्या बदल्यात दहा लाखांची खंडणी मागणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी संगीता बाळू मोरे (वय 40, रा. सिद्धिविनायक अपार्टमेंट, अशोकनगर, सातपूर) यांच्या मालकीची टेम्पो ट्रॅव्हलर्स, फोरव्हीलर, आयशर वाहन व वरना कार ही वाहने आहेत. आरोपी सुनील दगा माळी (रा. शिवाजीनगर, सातपूर), दर्शन बच्छाव, विशाल गरुड (दोघेही रा. सटाणा), राहुल मोरे (वय 40, रा. ध्रुवनगर (रा. शिवाजीनगर) व पिंटू गवळे (वय 43, रा. खुडाणा, निजामपूर, जि. धुळे) यांनी संगनमत करून फिर्यादी यांच्या मालकीची ही वाहने विश्वासाने व्यवसाय व देखभाल करण्यासाठी घेतली. दि. 11 जानेवारी 2023 रोजी ही वाहने ताब्यात घेतली.
त्यादरम्यान, पाचही आरोपींनी या वाहनांची बॉण्ड पेपरवर खोटी कागदपत्रे तयार करून बेकायदेशीररीत्या विक्री केली. ही बाब लक्षात आल्यानंतर फिर्यादी मोरे यांनी आरोपींकडे वाहने परत करण्याची मागणी केली असता आरोपींनी मोरे यांच्याकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागितली; मात्र दहा लाख रुपये देण्यास नकार दिल्यामुळे आरोपींनी या वाहनांचा अपहार करून फसवणूक केली.
या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात पाचही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.