नाशिकच्या सिडको परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सिडको परिसरातील स्टेट बँक चौकात काल रात्रीच्या सुमारास काही मद्यधुंद तरुणींनी धिंगाणा घातल्याची घटना घडली. या तरुणींचा धिंगाणा घातल्याचा हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं ?
सिडको परिसरातील स्टेट बँक चौकात काल रात्रीच्या सुमारास काही मद्यधुंद तरुणींनी धिंगाणा घातला. या तरुणींनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत एका व्यक्तीची कॉलर पकडून त्याला मारहाणही केली. त्यानंतर तरुणींनी फोन करून त्यांच्या साथीदारांना बोलावून घेतले. काही वेळातच दुचाकीवर आलेले तरुण, तरुणींची अवस्था पाहून त्यांना गाडीवर बसवून तेथून पसार झाले.
ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचण्यास विलंब केल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे. दरम्यान बघ्यांची गर्दी मात्र मोठ्या प्रमाणात येथे वाढली होती. नागरी वस्तीत अशा प्रकारचा प्रकार घडल्याने स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. यापूर्वीही इंदिरानगर आणि गंगापूर परिसरात मद्यधुंद तरुणींनी गोंधळ घातल्याचे प्रकार समोर आले आहेत.