विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटविणार्‍या आर्कि. अमृता पवार
विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटविणार्‍या आर्कि. अमृता पवार
img
दैनिक भ्रमर
शिक्षणाच्या प्रचंड आवडीमुळे बर्‍याच पदव्या प्राप्त करून बांधकाम आणि सहकार क्षेत्राबरोबरच, शिक्षण, आरोग्य, शेती आदी विविध क्षेत्रांत कार्यरत असलेली महिला म्हणून आर्कि. अमृता पवार या आपल्या वडिलांप्रमाणेच राजकारणातही तितक्याच जोमाने कार्यरत आहेत.

माजी खासदार व मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे माजी सरचिटणीस स्व. डॉ. वसंतराव पवार यांच्या कन्या अमृता पवार. त्या आज सर्वच क्षेत्रांत आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर वेगळेपण जपत आहेत. ज्या विषयाला हात घालेल तो यशस्वी करेन, हीच त्यांची कार्यपद्धत. मविप्र संस्थेच्या आर्किटेक्चर कॉलेजमधून आर्किटेक्ट झालेल्या अमृता पवार यांना राजकारण, समाजकारण, शिक्षण, आरोग्य, सहकार, सांस्कृतिक आदी सर्व विषयांचे बाळकडू लहानपणापासूनच आई-वडिलांकडून मिळाले.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्या निफाड तालुक्यातील देवगाव गटामधून विजयी झाल्या होत्या, तसेच सन 2016 पासून गोदावरी बँकेच्या त्या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. बँकेला अमृता पवार यांच्या कारकिर्दीत रिझर्व्ह बँकेकडून सातत्याने ‘ए’ ग्रेड मिळाले आहे. त्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका असून, शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर सातत्याने आवाज उठवून जेथे शेतकर्‍यांना न्याय मिळत नाही तेथे ठाम विरोध त्यांनी केला आहे.

अमृता पवार यांनी तुळजापूर प्राधिकरणाचे काम केले आहे. शिवाय शिर्डी प्रसादालय व लॅण्डस्कॅप, नाशिक येथील पंचवटीतील साधुग्राम प्रवेशद्वार, त्र्यंबकेश्‍वर येथील निवृत्तीनाथ महाराज देवस्थानचे काम त्यांनी आर्किटेक्टच्या माध्यमातून केले आहे. गेल्या नऊ वर्षांपासून सुश्रृत ग्रुपच्या अध्यक्षा म्हणूनही त्या काम सांभाळत आहेत. ग्रामीण भागातील अनेक समस्यांना हात घालण्याचा अध्यक्ष या नात्याने त्यांनी प्रयत्न केला आहे. शुद्ध पाण्याचा प्रश्‍न ऐरणीवर असताना गावांमध्ये आर ओ प्लांट बसविला आणि वॉटर एटीएम करून ग्रामपंचायतीला उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून दिले. देवगाव या त्यांच्या मतदारसंघात रस्त्यांची कामे, तसेच गावांतर्गत बरीच कामे केली. त्यांनी आपल्या काळात केली आहेत.

शेततळ्याचा गाळ काढणे, आरोग्य शिबिरांचे आयोजन, महिलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करून सर्वस्तरातील महिलांना सक्षम करून त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी सहकार्य करणे व त्यांना गरजेप्रमाणे सर्व मदत करण्याचा त्यांनी वसा घेतला आहे. अमृता पवार यांनी अमृत मत्स्य शेतकरी उत्पादन संघ स्थापन करून त्यामध्ये शंभर शेतकर्‍यांना शेततळी उपलब्ध करून दिली आहेत, तसेच नीलक्रांतीअंतर्गत सुरू असलेल्या प्रधानमंत्री मत्स संपदा योजनेच्या माध्यमातून शेतकरी व ग्रामीण भागातील महिलांना उदरनिर्वाहाची नवीन उपजीविका उपलब्ध करून देण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. या कामातून मार्केटिंग, खाते व्यवस्थापन, बीजपुरवठा हे सर्व कार्य संस्थेमार्फत पार पाडली जातात. त्यामुळे शेतकर्‍यांना थेट लाभ मिळावा, यासाठीचा त्यांचा प्रयत्न आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अमृता पवार यांनी सुमारे 60 ते 65 कोटींची विविध विकास कामे केली आहेत. नाशिक जिल्ह्यातून शिर्डीकडे जाणारा नैताळे, धारणगाव, देवगाव फाटा शिर्डी हायवेला जोडणारा रस्ता जर्मन टेक्नॉलॉजी वापरून 27 किलोमीटरपर्यंत बनविला आहे. त्यांनी कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये लोकांना बाहेर निघता येत नव्हते, अशा वेळी बीपी, शुगर, कॅन्सर, तसेच अन्य आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना त्यांच्या घरापर्यंत औषधे पोहोचविण्याची व्यवस्था केली होती. पीपी किट घालून पहिल्या व दुसर्‍या लाटेत त्यांनी भरपूर सेवा केली.

नाशिकच्या तपोवनातील साधुग्रामचे प्रवेशद्वार आर्कि. अमृता पवार यांनी तयार केले, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. शिर्डी प्रसादालयाचे काम केल्याबद्दल भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. व्हिजन 2020-2030 साठी अमृताताईंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला आहे. नाशिक जिल्हा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक असोसिएशनचा देखील त्यांना ’न्युबा अ‍ॅवॉर्ड 2020’ चा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

 कोरोना काळात केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना ’कोरोना योद्धा’, किसान सभेचा ’सहकार रत्न’, युथ फार्मर्स फाऊंडेशनचा ’कृषी प्रेरणा सन्मान’ तसेच महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रामध्ये लॅण्डस्कॅप केल्याबद्दल ’ग्रीन असोसिएशन पुरस्कार’ आदी विविध छोटे-मोठे पुरस्कार मोठ्या प्रमाणात मिळाले आहेत. समाजाने आपल्याला भरपूर काही दिले. त्यामुळे समाजासाठी आपण काहीतरी करावे या भावनेतून त्या अनेक वर्षांपासून समाजकार्यात हिरिरीने सहभाग घेत असल्यामुळे एक महिला असूनही त्यांच्या कार्याचे वेगळेपण आपल्याला पाहायला मिळते.
Nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group