किम्स मानवता हॉस्पिटल येथे ४ महिन्याच्या बाळावर यशस्वी “ओपन हार्ट सर्जरी”
किम्स मानवता हॉस्पिटल येथे ४ महिन्याच्या बाळावर यशस्वी “ओपन हार्ट सर्जरी”
img
दैनिक भ्रमर
नाशिक : केवळ ४ महिन्याच्या अयान या बालकावर अत्यंत जटिल ओपन हार्ट सर्जरी यशस्वीरीत्या करण्यात आली असून, या शस्त्रक्रियेद्वारे बाळाला नवजीवन प्राप्त झाले आहे. ही दुर्मिळ आणि आव्हानात्मक शस्त्रक्रिया किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिक येथे डॉ. ललित लवणकर इंटरव्हेन्शनल कार्डियोलॉजिस्ट यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या शस्त्रक्रियेत डॉ. सारंग  गायकवाड नवजात शिशु व बालरोग हृदयविकार शस्त्रक्रिया तज्ञ ,,डॉ. रचित मेहता अतिदक्षता नवजात शिशु व बालरोग तज्ञ ,तसेच डॉ मिलिंद गांगुर्डे , डॉ. सोनाली म्हात्रे-पराधे नवजात शिशु व बालरोग तज्ञ यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. 

या बाळाला हृदयविकाराची लक्षणे दिसल्याने काही चाचणी आणि तपासणी नंतर Anomalous Left coronary artery arising from pulmonary artery (ALCAPA) या आजाराचे निदान झाले. या बाळाच्या हृदयामध्ये जन्मजात हृदयविकार (Congenital Heart Defect) होता. मानवी हृदयाला दोन प्रमुख रक्तवाहिन्या रक्तपुरवठा करतात, त्यापैकी डावी रक्तवाहिनी सर्वात महत्त्वाची असते. ती शुद्ध (ऑक्सिजनयुक्त) रक्त पुरवते. परंतु अयानच्या बाबतीत ही डावी रक्तवाहिनी उलट्या प्रकारे जोडली गेली होती, त्यामुळे शुद्ध रक्ताऐवजी अशुद्ध रक्त हृदयाला पुरवले जात होते. परिणामी हृदयाला पुरेसा ऑक्सिजन मिळत नव्हता आणि ते व्यवस्थित कार्य करू शकत नव्हते.


जसे वृद्धांमध्ये ब्लॉकेज निर्माण होतात, तसेच या बाळाच्या रक्तवाहिन्यांमध्येही अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे बाळाला बॅक्टेरियल इन्फेक्शन देखील झाले. या सर्व अडचणींच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी हृदयाच्या उजव्या बाजूला चुकीच्या ठिकाणी असलेली रक्तवाहिनी शस्त्रक्रियेच्या माध्यमातून योग्य ठिकाणी बसवली ही अत्यंत जटिल आणि नाजूक प्रक्रिया होती. 

सामान्यपणे हृदयाची पंपिंग क्षमता (Ejection Fraction) सुमारे ६०% असते, परंतु या बाळाची क्षमता केवळ १५% इतकी होती, ज्यामुळे शस्त्रक्रियेचा धोका अधिक वाढला होता. त्यातच बॅक्टेरियल इन्फेक्शन असल्याने ही सर्जरी अत्यंत आव्हानात्मक ठरली. परंतु डॉक्टरांच्या कौशल्य, अनुभव आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. 

डॉ. ललित लवणकर यांनी सांगितले, चार महिन्याच्या अशा लहान बाळावर ओपन हार्ट सर्जरी करणे अत्यंत कठीण असते. बाळाच्या हृदयातील रचना, रक्तवाहिन्यांचे आकार आणि इन्फेक्शन या सगळ्यांचा विचार करून अचूक नियोजन करावे लागते. आमच्या टीमच्या अनुभवामुळे आणि रुग्णालयातील आधुनिक सुविधा यामुळेच हे शक्य झाले.

डॉ. राज नगरकर, मॅनेजिंग डायरेक्टर , किम्स मानवता हॉस्पिटल, यांनी सांगितले, ही शस्त्रक्रिया आमच्या टीमच्या तज्ज्ञतेचा आणि रुग्णालयातील अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा पुरावा आहे. उत्तर महाराष्ट्रात अशा जटिल आणि दुर्मिळ हृदयशस्त्रक्रिया यशस्वीरित्या होणे ही नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे. आमचे ध्येय म्हणजे प्रत्येक रुग्णाला जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देणे.  तसेच या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे नाशिकमध्येही बालहृदयरोग उपचारांसाठी प्रगत तंत्रज्ञान व तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे. आम्ही रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत.
बाळ अयान सध्या उपचाराखाली असून त्याची प्रकृती स्थिर आहे. बाळाच्या पालकांनी डॉक्टरांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
Nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group