नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- हॉस्पिटल सुरू करण्याकरिता लागणारे साहित्य खरेदी करण्याचा बहाणा करून नाशिकच्या इसमास तोतया डॉक्टरसह त्याच्या साथीदाराने 47 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी हे नाशिक येथे राहतात. मे ते दि. 16 सप्टेंबर 2025 दरम्यान डॉ. जेम्स मार्क असे नाव सांगणारा त्याचा अनोळखी साथीदार बेंजामिन याच्यासोबत संगनमत करून फिर्यादीशी मोबाईल फोनद्वारे संपर्क साधला. त्यानंतर दोघा संशयितांनी संगनमत करून हॉस्पिटल सुरू करण्याकरिता लागणारे साहित्य खरेदी करण्याचा बहाणा करून फिर्यादीला वेगवेगळ्या बँक खात्यांत वेळोवेळी एकूण 46 लाख 70 हजार रुपये भरावयास लावले.
काही दिवसांनंतर आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी आरोपींच्या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तो होऊ शकला नाही. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात डॉ. जेम्स मार्क व बेंजामिन या संस्थेच्या विरुद्ध ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिसे करीत आहेत.