भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या 29 वर्षीय युवकावर त्याच्याच ओळखीच्या असलेल्या आरोपींनी कोयत्याचे वार करून जीवघेणा हल्ला केल्याची घटना सातपूर गावात घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी चंद्रेश शंकर विश्वकर्मा (वय 29, रा. म्हाडा कॉलनी, सातपूर-अंबड लिंक रोड) हे दि. 15 ऑक्टोबर रोजी त्यांच्या मित्राला सोडण्यासाठी सातपूर गावातील जगतापवाडी येथे गेले होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीचे असलेले चौघे एका व्यक्तीला मारहाण करीत असल्याचे विश्वकर्मा यांनी पाहिले.
हे पाहून विश्वकर्मा यांनी आरोपींना समजावण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने आरोपी ओम्कार ऊर्फ घार्या शेलार याने लोखंडी हत्याराने विश्वकर्मा यांच्या डोक्यावर वार केला. यावेळी आरोपी तुषार गायकवाड ऊर्फ चिक्या, सौरभ ऊर्फ चंद्य्रा आणि कुलदीप यांनी चंद्रेशला लाकडी दांडक्याने फरशी व विटांनी मारहाण करून गंभीर जखमी केले.
दरम्यान, तुषार गायकवाडने त्याच्याकडील बंदूक विश्वकर्मा यांच्या तोंडात ठेवून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीदरम्यान चंद्रेश विश्वकर्मा स्वत:चा जीव वाचविण्यासाठी एका घरात लपून बसले. सर्व आरोपींनी लोखंडी कोयता व लाकडी दांड्याने त्या घराच्या खिडक्या व दरवाजांचे नुकसान करीत तेथे उभ्या असलेल्या वाहनावर वार करून गाडीचे नुकसान करीत दहशत निर्माण केली.
या प्रकरणी या सर्व आरोपींविरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तुषार गायकवाड व ओम्कार शेलारला अटक केली असून, सौरभ आणि कुलदीप अद्याप पसार आहेत. चंद्रेश विश्वकर्मा याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर चंद्रेशला डिस्चार्ज देण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब दहिफळे करीत आहेत.