48 वर्षीय नाशिक रोडकर 126 वर्षांचा दाखवला – निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह
48 वर्षीय नाशिक रोडकर 126 वर्षांचा दाखवला – निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह
img
Chandrakant Barve
नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी) – भारत निवडणूक आयोगाच्या मतदार ओळखपत्र वितरण प्रक्रियेत झालेल्या गंभीर त्रुटीचा आणखी एक धक्कादायक प्रकार नाशिक रोड येथे उघड झाला आहे. गौतम संपत सोनवणे (वय 48) या नागरिकाला मिळालेल्या नवीन मतदार ओळखपत्रावर त्यांचे वय तब्बल 126 वर्षे दाखवण्यात आले आहे. चुकीच्या जन्मतारखेच्या नोंदीमुळे हा विचित्र प्रकार समोर आला असून निवडणूक आयोगाच्या डेटा व्यवस्थापन आणि पडताळणी प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


गौतम सोनवणे यांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज करून नवीन मतदार ओळखपत्रासाठी अर्ज केला होता. त्यांच्या कागदपत्रांनुसार त्यांची खरी जन्मतारीख ५ डिसेंबर १९७७ आहे. मात्र आयोगाकडून मिळालेल्या मतदार ओळखपत्रावर ३० डिसेंबर १८९९ अशी जन्मतारीख नमूद करण्यात आली असून त्यामुळे त्यांचे वय १२६ वर्षे दाखवले गेले आहे. हा प्रकार उघड होताच परिसरात आश्चर्य आणि संताप व्यक्त करण्यात आला आहे.

नाशिक रोड येथील वृत्तपत्र विक्रेत्यांनी हा प्रकार पुढे आणला असून, निवडणूक आयोगाच्या कामकाजातील हलगर्जीपणावर टीका केली आहे. “प्रत्येक नागरिकाकडून अचूक माहिती आणि कागदपत्रे मागवली जातात, पण पडताळणी न करता अशा हास्यास्पद चुका होतात, हे अत्यंत गंभीर आहे,” अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी निवडणूक आयोगाच्या भोंगळ कामकाजाचा निषेध नोंदवला आहे. मतदार ओळखपत्रात सतत तांत्रिक चुका, चुकीच्या तारखा आणि माहितीतील विसंगती या प्रकरणांनी निवडणूक व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

वृत्तपत्र विक्रेता गौतम सोनवणे यांनी सांगितले, “मी सर्व योग्य कागदपत्रांसह अर्ज केला होता, तरीसुद्धा माझी जन्मतारीख एवढी मोठ्या प्रमाणात चुकीची नोंदवली गेली. हा केवळ तांत्रिक दोष नसून प्रशासनाचा निष्काळजीपणा आहे. यावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
Nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group