नाशिक : प्रभाग क्रमांक २६ च्या माजी नगरसेविका तसेच युवती सेनेच्या जिल्हाप्रमुख आणि उत्तर महाराष्ट्र निरीक्षक सौ. हर्षदा गायकर यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात विविध अफवा पसरविल्या जात आहेत. “हर्षदा गायकर या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत,” अशा उलटसुलट चर्चांना आता त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट उत्तर दिले आहे.

हर्षदा गायकर म्हणाल्या की, “मी शिवसेना शिंदे गटाची कार्यकर्ती असून, मुख्य नेते व राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच कार्य करत आहे. त्यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक २६ मध्ये तब्बल २२ कोटी रुपयांचा निधी विविध विकासकामांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. रस्ते, गटारे, पाणीपुरवठा, आणि सार्वजनिक सुविधा या सर्व क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे.”
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “काही कार्यकर्त्यांकडून चुकीची माहिती देत माझ्या भाजप प्रवेशाबाबत अफवा पसरवल्या जात आहेत, मात्र असा कोणताही प्रकार नाही. मी शिवसेना शिंदे गटातच कार्यरत राहणार आहे आणि पक्षाच्या विचारधारेप्रती निष्ठावंत आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
शिवसेनेबद्दल बोलताना हर्षदा गायकर म्हणाल्या, “शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेतून उभी राहिलेली जनसामान्यांची संघटना आहे. जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करणे हीच शिवसेनेची ओळख आहे. हाच वारसा मी आणि माझे कार्यकर्ते पुढे नेत आहोत.”
शिवसेनेच्या स्थापनेपासूनच हर्षदा गायकर या पक्षात सक्रीय आहेत. गायकर कुटुंबाचे या पक्षाशी जुने व घट्ट नाते आहे. तसेचपत्रकार परिषदेत त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, “गैरसमज व अफवांपासून सावध राहा. आपण सर्वजण एकत्र राहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहराचा विकास घडवूया.”
शिवसेनेप्रती निष्ठा कायम ठेवण्याचे आश्वासन हर्षदा गायकर यांनी दिले. त्यांच्या या निवेदनामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये स्पष्टता निर्माण झाली असून, प्रभाग २६ मध्ये पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाचा आत्मविश्वास दृढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.