नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी):- प्रॉपर्टीच्या जुन्या वादातून पहाटे गुरुद्वारामध्ये सेवा देण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवशक्ती नगर, चव्हाण मळा येथे आज पहाटे घडली. या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या चार तासांत आरोपींना गजाआड करण्यात यश मिळवले आहे.

या हल्ल्यात अमोल शंकरराव मेश्राम (वय ४०, रा. शाबरमती सोसायटी, चव्हाण मळा) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेश्राम हे दररोज पहाटे नाशिक-पुणे महामार्गावरील गुरुद्वारामध्ये पूजाअर्चा आणि सेवा करण्यासाठी जात असत. आज पहाटे सुमारे पाच वाजेच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे गुरुद्वाराच्या दिशेने निघाले असता, दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी त्यांना अडवले.
सदर दोघांपैकी कुणाल सौदे (वय २१, रा. फर्नांडिस वाडी) आणि अमन शर्मा (वय १८, रा. सिन्नर फाटा) यांनी जुन्या प्रॉपर्टीच्या वादातून मेश्राम यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करताना मेश्राम यांनी वार हातावर झेलले; मात्र प्रचंड रक्तस्रावामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, संदीप पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
उपनगर पोलिस आणि क्राईम युनिटने संयुक्तरीत्या तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत अवघ्या चार तासांच्या आत दोघा हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत समोर आले की, मेश्राम आणि कुणाल सौदे यांच्यात प्रॉपर्टी संदर्भात जुना वाद होता. कुणाल सौदे याच्यावर यापूर्वी आडगाव पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हाही दाखल आहे. तर अमन शर्मा हा इयत्ता बारावीचा विद्यार्थी असून त्यानेही या कटात सहभाग घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असले तरी, पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे गुन्ह्यांचा तपास झपाट्याने पूर्ण होत आहे. पहाटे घडलेल्या या खुनाच्या घटनेमुळे नाशिक रोड आणि शहर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.