नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी):- महिला पोलीस कर्मचारी आणि एका गृहिणीच्या घरात डल्ला मारून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबतची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांनी दिली.

गेल्या काही महिन्यांपासून नाशिक रोड परिसरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली असली तरी गुन्हे शोध पथकाने प्रत्येक गुन्ह्याचा तपास यशस्वीरीत्या पूर्ण करत नागरिकांचा विश्वास जपला आहे.
३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या दरम्यान महिला पोलीस कर्मचारी सुप्रिया रावसाहेब दिघे (राहणार शितल रेसिडेन्सी, पळसे) आणि गृहिणी स्नेहा किशोर पाटेकर (राहणार विश्वेश्वर अपार्टमेंट, चेहेडी पंपिंग) यांच्या घरात चोरी झाली होती. चोरट्याने दोन तोळे सोन्याच्या चेन, तसेच ३ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण २ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.
या घटनेचा तपास सुरू असताना गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील, महेंद्र जाधव, सागर आडणे, अरुण गाडेकर, रोहित शिंदे आणि योगेश रानडे हे ३ ऑक्टोबर रोजी रात्री सिटी लिंक बस डेपो परिसरात गस्त घालत असताना सागर दत्तात्रय गरड (वय ३३, रा. बळी मंदिर, आडगाव) हा संशयित हालचाल करताना आढळला. चौकशीत त्याच्यावर पूर्वीही घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले. अधिक चौकशीत त्याने दोन्ही घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेली सोन्याची चेन आणि रोख रक्कम हस्तगत केली.
ही कारवाई पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार आणि गुन्हे शोध पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
अवघ्या चार दिवसांत दोन घरफोड्यांचा तपास पूर्ण करून अट्टल चोराला गजाआड केल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.