नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : नाशिकमधील ज्येष्ठ विधिज्ञ एस. एल. देशपांडे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युसमयी ते 75 वर्षांचे होते.
भाऊसाहेब देशपांडे यांच्यापासून देशपांडे घराण्याला वकिलीचा वारसा आहे. तो एस. एल. देशपांडे यांनी पुढे चालविला. एस. एल. देशपांडे यांनी रेंट अॅक्टमध्ये प्रॅक्टिस करीत वकिली व्यवसायाला सुरुवात केली. या कायद्याची सखोल माहिती त्यांना होती.
दिवाणी दाव्यांमध्ये त्यांचा हातखंडा होता. नंतर त्यांनी कन्व्हेसिंगची प्रॅक्टिस सुरू केली. त्यावेळेपासून त्यांचे भाऊ यू. एल. देशपांडे त्यांच्यासोबत काम करीत आहेत. मालकी हक्काबाबत निर्णय व जमिनींचे टायटल यात त्यांना भावाचे मोठे सहकार्य लाभले. अनेक आजही अनेक बिल्डर त्यांचे मार्गदर्शन घेत असायचे. नाशिकमधील अनेक बांधकाम व्यावसायिकांचे काम हे एस. एल. देशपांडे यांच्याकडे होते.
हे ही वाचा...
कोर्टापुढे निर्भीडपणे पक्षकारांची बाजू मांडणार्यांमध्ये त्यांचा नावलौकिक होता. कालांतराने आरोग्याच्या तक्रारीमुळे त्यांनी वकिली बंद करून काऊन्सेलिंग व सल्ला देण्याचे काम सुरू केले. त्यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक वकील व न्यायाधीश घडविले. नाशिकच्या वकिली क्षेत्रात त्यांना मानाचे स्थान होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, भाऊ व भावजय असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने अभ्यासू व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना अॅड. दिलीप वनारसे यांनी व्यक्त केली. देशपांडे परिवाराच्या दु:खात भ्रमर परिवार सहभागी आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी ११ वाजता निघणार आहे.