नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी):- अमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात उपनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत सराईत गुन्हेगारासह दोघांकडून अंमली पदार्थ आणि शस्त्रसाठा जप्त केला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी दिली.
दुर्गामाता मंदिर परिसरातून दोन संशयितांना पकडत पोलिसांनी एम.डी. अंमली पदार्थ, रोख रक्कम, मोटारसायकल आणि मोबाईल असा सुमारे १.१८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. चौकशीतून उघडकीस आलेल्या सराईत गुन्हेगाराकडून तब्बल १० ग्रॅम एम.डी. आणि दोन गावठी कट्टे असा आणखी ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकातील पोलीस कर्मचारी सूरज गवळी यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर दुर्गामाता मंदिर, जुना सायखेडा रोड परिसरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शकांना खाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस हवालदार संदीप पवार,विनोद लखन, गौरव गवळी, प्रशांत देवरे, पंकज कर्पे यांनी सापळा रचला. पथकाने सौरभ दिगंबर महाले (वय २७, राहणार धात्रक फाटा नाशिक ) आणि कौस्तुभ धनंजय इखनकार ( वय २४, राहणार दुर्गामाता मंदिराच्या पाठीमागे जेलरोड नाशिकरोड ) या दोन संशयितांना शिताफिने ताब्यात घेतले असता त्यांच्या अंगझडतीतून ५ ग्रॅम एम.डी., रोख ९ हजार रुपये, मोटारसायकल आणि मोबाईल असा एकूण १.१८ लाखांचा मुद्देमाल मिळून आला. त्यांच्या चौकशीतून मुख्य पुरवठादार इशाद चौधरी या सराईत गुन्हेगारास ताब्यात घेण्यात आले.
जयभवानी रोड परिसरात राहणाऱ्या या सराईत गुन्हेगाराकडून ५ ग्रॅम एम.डी. आणि दोन गावठी कट्टे असा ५६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्याच्यावर तब्बल पाच गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. या धडक कारवाईत पोलिसांनी एकूण १,७४,१०० रुपयांचा अमली पदार्थ आणि शस्त्रसाठा जप्त केला आहे. उपनगर पोलिसांच्या या मोहिमेमुळे शहरातील अमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून या अवैध धंद्याला मोठा आळा बसेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे आणि सहायक आयुक्त डॉ सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, शहरात कुठेही अमली पदार्थाची विक्री किंवा सेवन होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित पोलिसांना कळवावे. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.